मुंबई, ता. २० - मराठी माणसाने आता नोकरी एके नोकरी चा पाढा सोडून उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेऊन प्रगती साधण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात सॅटरडे क्लब बिझनेस एक्सलन्स पुरस्काराचे वितरणप्रसंगी केले.
ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, जीटीएल कंपनीचे संस्थापक गजाननराव तिरोडकर आणि सॅटरडे क्लबचे सर्वेसर्वा माधवराव भिडे उपस्थित होते. यावेळी तिरोडकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. औरंगाबादच्या आर. जे. जोशी यांच्यासह २० विविध उद्योजकांना सन्मानित करण्यात आले.
श्री. भुजबळ म्हणाले, की मराठी माणसाने आता उद्योगाविषयीची आपली नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे. याला आवश्यक असलेल्या आर्थिक मार्गदर्शनासाठी माधवराव भिडे यांच्यासारखे अनेक दिग्गज आहेत. यांचे मार्गदर्शन व शासकीय पातळीवरील उपलब्ध सवलती, योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधण्यासाठी मराठी माणसाने पुढे येण्याची गरज आहे. यावेळी कुमार केतकर यांनी मराठी माणसाच्या उद्योगाविषयक नकारात्मक मानसिकतेची मीमांसा करताना अलिकडे अनेक मराठी उद्योजक आपल्या कार्याची पताका उंचावत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यूएफओ चे संजय गायकवाड, सचिन ट्रॅव्हल्सचे सचिन जकातदार यांच्यासह चेन्नई, बंगळूर, कोलकाता आदी ठिकाणचे मराठी उद्योजक उपस्थित होते.