मुंबई, ता. २४ - येथून जवळच असलेल्या जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा केव्हज् असलेल्या घारापुरी बेटावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातपर्फे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने शनिवारी (ता. २६ फेब्रुवारी) स्वच्छता व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. एलिफंटा केव्हज् (गुहा)नां देशासह विदेशातील पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देतात. परिणामी परिसरात प्लॅस्टिकचा कचरा विखुरलेला असून हा कचरा लाटांमुळे बेटावर जाऊन अडकतो. या कचर्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०० स्वयंसेवकांसह महामंडळ, वनविभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत घारापुरी यांचाही मोहिमेत मोठा सहभाग असेल. स्वच्छतेनंतर प्रबोधन करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे येणार्या बोटींमध्येही स्वच्छताविषयी फलक लावण्यात येणार आहेत.