मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

deputy chief minister लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

विजयी उमेदवारांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे: भुजबळ

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गोरगरीब शेतकर्‍यांच्या हितालाच सर्वाधिक प्राधान्य द्यावे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. श्री. भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने अठरा पैकी सोळा जागा जिंकून विजय मिळवला. यानिमित्त विजयी उमेदवारांनी त्यांची रामटेक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले, की बाजार समितीमधील प्रत्येक घटकाला आपल्या कष्टाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. परंतु प्राधान्य गोरगरीब शेतकर्‍यांच्या हिताला असावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम करावे. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणाव्या, राबवाव्या. यावेळी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भास्करराव बनगर, जगदीश होळकर, भाऊसाहेब भवर आदी उपस्थित होते

भुजबळ यांची वेबसाइट...

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेबसाइट तयार करण्यात आली आहे. पुण्याच्या चिंतन ग्रुपने ही वेबसाइट तयार केली असून www.chhaganbhujbal.org असा वेबसाइटचा पत्ता आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकर आणि भाषा संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या हस्ते वेबसाइटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. भुजबळ यांच्या जीवनकार्याची माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने चिंतन ग्रुपने हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. यावेळी भुजबळ यांनी सांगितले, की अनेकांनी आपल्याला जीवनकार्य लिहिण्याची विनंती केली. परंतु अद्याप आपल्याला बरेच कार्य करायचे आहे. ही वेबसाइट नियमित अपडेट केली जाणार असून इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांचा पर्याय उपलब्ध असलेल्या या वेबसाइटमध्ये भुजबळ यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. भुजबळ यांच्या दैनंदिन कार्यक्रमाच्या बातम्या, छायाचित्रे आणि वृत्तपत्रातील कात्रणांचा येथे समावेश असेल.