मुंबई, दि. 4 : राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकांबाबतच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील निकषात बदल केला आहे. मागासवर्गीय उमेदवारांना याचा लाभ मिळावा म्हणून 21 ऑक्टोबर 2012 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 5 ऑक्टोबर ऐवजी 6 ऑक्टोबर 2012 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली. राज्यातील 4 हजार 637 ग्रामपंचायतींसाठी 21 ऑक्टोबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने 25 सप्टेंबर 2012 रोजी केली होती. त्यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम 10-1अ मधील तरतुदीनुसार आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नामनिर्देशनपत्रासोबतच जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते; परंतु त्यात आता राज्य शासनाने सुधारणा केली आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नसल्यास संबंधित उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे जातीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी दिल्याची पावती किंवा पुरावा नामनिर्देशनपत्रासोबत जोडावा...