friendship लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
friendship लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

इंटरनेटवर मैत्री करताय...जरा जपून!




दशकापासून इंटरनेटच्या नेटमध्ये फक्त तरुणाईच गुंतली होती...!  आजकाल कुतूहलाने का होईनां वडिलधारी मंडळी सुद्धा इंटरनेटवर सर्फ करू लागली आहे. सोशल नेटवर्क, सामाजिक वेबसाइट्सच्या माध्यमातून मित्र-मंडळी जमवू लागली आहे. यानिमित्ताने, इंटरनेटवर मैत्री करताना जपून, विचारपूर्वक करावी, हेच इथे नमूद करावसं वाटतंय...!

Share life’s important moments with just right people!रोजचं काम सुरू असताना एका ठिकाणी ही ओळ दिसली आणि बस्स…! विचारचक्र सुरू झालं, हे वाक्य सर्वसामान्यांच्या जीवनात बरंच काही सांगून जातं, केवळ हृदयात नाही तर मनात सुद्धा घर करून जाणारी ही ओळ वाटली. लहानपणी आई-वडील बाहेर जाताना, अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, त्यांना घरात घेऊ नका, आतूनच त्यांच्याशी बोला, खूपच भीती वाटली, काही काळंबेरं वाटलं तर अगदी आरडाओरड करा. प्रवासात जाताना कोणाला आपलं खरं नाव तर अजिबात सांगू नका... जवळपास असाच डोस प्रत्येकालाच देतात, आईवडीलच नाही, तर साssरी वडील मंडळी हाच डोस देतात, हा डोस आपल्याला का देतात? असं लहानपणी त्या वयामुळे वाटतं. मात्र सध्याचा काळ, वेळ, घटना पाहता हे खूपच मौलिक होतं असं आता वाटू लागलंय.

इंटरनेटचं, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचं महत्त्व वाढलं असलं तरीही वृत्तपत्राचं महत्त्व अजून कमी झालेलं नाही, कागद महाग झाला असला, तरी सुद्धा बातमीचं मूल्य अमूल्य आहे. अजून पेपर घ्यायला कोणी महाग झालेलं नाही. कोणतीही बातमी आदल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांवर पाहिली तरीही दुसर्‍या दिवशी सकाळच्या चहाच्या पहिल्या घोटाबरोबर हातात पेपर पाहिजेच, पेपर आलेला नसला, तर बेचैन होते. कारण फक्त एकच, इत्यंभूत माहिती! दररोजच्या घात-अपघाताच्या बातम्या, घडामोडींबरोबर, बौद्धिक खाद्य सुद्धा प्रसार माध्यमं देतातच. ते फक्त थोडंस शोधावं लागतं, इतकंच. कूर्म-गतीने का होईना, लोकांना आता इंटरनेट चं महत्त्व पटतंय. सदु-पयोगासाठी इंटरनेट इतकं पटकन माहिती देणारं दुसरं कोणतंही माध्यम नाही (शिक्षक, गुरुजन, संबंधित वगळून). खरंतर, इंटरनेट नंतर माहिती मिळण्याचं काही अंशी दुसरं आगार असेल, तर ते म्हणजे सध्याची अगदी शाळेत जाणारी मुलं सुद्धा...। वडिलधारी मंडळी करत असलेली चर्चा ऐकून अर्धे लक्ष अभ्यासात आणि अर्धे चर्चेकडे असलेली ही मुलं चर्चेत केव्हा सहभागी होतात आणि सोल्यूशन सुद्धा सांगून जातात हे कळतच नाही. हे सोल्यूशन मानणार्‍या, समजून घेणार्‍या पालकांची संख्या अजून पाहिजे तितकी जास्त नाही. आमचा मुलगा/मुलगी खूप हुश्शार आहे... अशी स्तुतीसुमनं लोकांसमोर उधळायला मात्र कोणी विसरत नाही. प्रत्यक्षात मात्र, मुलांना अजून ती लहान असून अशा चर्चांमध्ये डोकावू नये असा समज द्यायला सुद्धा विसरत नाहीत.

मुलांचं ऐकून, त्यांच्याकडून इंटरनेटचं प्रशिक्षण घेणारी मंडळीही कमी नाहीत. मुलं शाळेत गेल्यानंतर दैनिक कामं आटोपून दुपारी फावल्या वेळात इंटरनेटवर सर्फिंग करणारे आजी-आजोबा सुद्धा आता दिसू लागलेत. मुलांचे आई-बाबा सुद्धा याला अपवाद नाहीत. वीकएन्ड किंवा कामावरून रात्री घरी आल्यानंतर थोडा वेळ नेट सर्फिंग करणे हा अनेकांचा नित्यनियम झाल्याचे दिसून येते. सध्या सोशल वेबसाइटच्या माध्यमातून मैत्री जोडण्याचं जणू पेव फुटलंय. अनेकांना वर्षानुवर्ष न भेटलेले मित्र भेटतात, परीचय होतात. तरुणाईच काय, अगदी शाळेत असलेली पोरं सुद्धा इंटरनेटवर अक्षरशः असतात (असंच म्हणाव लागेल). वयाची तीशी (३० वर्षे) पार केलेली मंडळी, मध्यम वयीन, प्रौढ सुद्धा सोशल वेबसाइट किंवा इंटरनेटवर तासन-तास घुटमळतात. दिवसभर घरात कोणीही नसल्याने एकटेपणा घालवायला, सुट्टीच्या दिवशी वेळ घालवायला इंटरनेट हे एक चांगले माध्यम बनल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. अशावेळी कोणाशीतरी मैत्री करावी असे अनेकांना वाटत असेलच, कॉलेजमध्ये जाणार्‍या युवकांपासून मध्यम वयीन लोकांपर्यंत ही संख्या भरपूर आहे. दररोज पेपर वाचनाची सवय असल्यामुळे एक दिवस जरी पेपर आला नाही, वाचला गेला नाही, तर जशी घालमेल होते, चुकल्याचुकल्यासारखे वाटते, तसेच एकमेकांशी परीचय झाल्यानंतर दररोज एकमेकांशी बोलल्याशिवाय अर्थातच चॅटिंग केल्याशिवाय चुकल्याचुकल्यासारखी वाटणारी भरपूर मंडळी आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर नकळत फसवणुक होण्याच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत आहे.

Don’t post photos that looks stunning… ही ओळ वाचल्यानंतर विशेषतः महिलांच्या दृष्टीने याचा उल्लेख करावासा वाटतो...! आजकाल कॉम्प्यूटर हा जणू काही आवश्यकच झाला आहे. जवळपास प्रत्येक घरात टीव्ही असतो, तसेच दिवस लवकरच येतील आणि सामान्यजनांकडेही कॉम्प्यूटर असेल, सगळं जग लवकरच खूप्पच जवळ येईल याची ही नांदी आहे. इंटरनेटवर ओळख झाल्यानंतर कोणीही आपला फोटो पोस्ट करतोच. त्यातल्या त्यात आपण सगळ्यात छान दिसत असलेला फोटो पोस्ट करण्यात तर मित्र-मैत्रिणींची जणू स्पर्धाच लागलेली असते. मात्र, यात भावनेला आवर घालून दूरदृष्टीने संभाव्य धोके लक्षात घेऊन शक्यतो फोटो पोस्ट करू नये, लावू नयेत. अगदी पोस्ट करायचे ठरवल्यास साधारण फोटो पोस्ट करावा असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते. आप्त-स्वकिय, जीवलग मित्र-मैत्रिणी, समूह यांच्याशिवाय शक्यतो बाहेर मैत्री करू नये. काही अडचण आल्यास आपल्या पालकांना सांगावे अथवा पालकांसह, कायदेतज्ञ किंवा संबंधित पोलिस ठाणे, सायबर गुन्हे शाखेशी विनाविलंब संपर्क साधावा.

काळ अक्षरशः भरभर पुढे जातोय, जग मोठं, आयुष्य छोटं होतंय. आपण संपलो तरी कामं संपणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. काळाच्या ओघात जगाबरोबर चालणं, प्रवाहाबरोबर पुढे वाटचाल करत रहाणं हे जरी खरं असलं तरीही आपण करत असलेलं कार्य, जोडत असलेली योग्य असल्याबाबत जाणून घेणं आवश्यक आहे. आयुष्याचे कोणतेही क्षण महत्त्वाचेच असून योग्य पावले वेळीच उचलल्यास हेच क्षण सोनेरी ठरतील, यात शंकाच नाही!

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

इंटरनेटमुळे बहिण-भाऊ झाले मित्र...

इंटरनेटच्या माध्यमातून दिवसेंदिवस जग जवळ येत आहे. अगदी दिल्लीपासून गल्ली देखील जवळ आली आहे. देशांतर्गत, परदेशात स्थायिक झालेली कुटुंब सुद्धा याला अपवाद नाहीत. दूर राहून एकमेकांची सुखदुःख विचारणारे बहिण-भाऊ आता एकमेकांचे मित्र बनले आहेत.
एक काळ होता..महिलांनी घराबाहेर जास्त जाऊ नये, सुधारणावादी महिलांना यामुळे सासरी अथवा काही प्रमाणात माहेरी देखील त्रास सहन करावा लागत होता. शिक्षण देखील मुलांनाच जास्त दिले जात होते, अशा पूर्वीच्या काळातल्या विविध गोष्टींचा उल्लेख आता करायची गरज वाटत नाही, त्या जगजाहीर आहेतच. परंतु आता काळ बदललाय, जग खूपच जवळ आलं आहे. घरी बसून केवळ स्वयंपाक करणार्‍या महिलांचे हात आता विविध क्षेत्रात आपले करियर करताहेत. आज भारतासारख्या भावी महासत्ता म्हणून पाहिल्या जाणार्‍या देशाची धुरा देखील एक महिलाच सांभाळते आहे. शिक्षण-प्रशिक्षण आणि चालना यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांचा विकास झाला असून या यशामागे पुरुषांबरोबर महिलांचाही मोठा वाटा आहे. अनेक देश आता सैन्यातही महिलांच्या पथकांचा समावेश करण्यास धजावले आहेत. लोहमार्गावर रेल्वे चालकापासून वैमानिकाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याच्या कार्याची भरारी महिलांनी मारली आहे. एकंदर सर्वच बाबतीत महिला अग्रेसर आहेत. मुलांनी मुलांशी आणि मुलींनी मुलींशी फक्त मैत्री करावी, हे विचार आता मागे पडले असून सध्याइंटरनेटच्या काळात मुलं अथवा मुली यांच्यात अंतर फारसे राहिलेले नाही.
मुलं आणि मुलींची मैत्री नाही असे आता अजिबात दिसत नाही. अगदी स्वच्छंदी, निखळ मैत्री या दोघांमध्ये असल्याचे अनेकदा दिसते (काही ठिकाणी विकृतीमुळे अपवादात्मक एकतर्फी काही गोष्टी घडतात, हे वेगळे).
काळ बदलल्याप्रमाणे जुन्या पिढीने सुद्धा हे बदल स्वीकारले असल्याचा हा परिणाम असावा...। जुनी पिढी म्हटली म्हणजे कडक स्वभाव, तिखट, मुलांना नेहमीच डोस देणारी, रागावणारी...वडिलांना तर 'हिटलर' या भावनेनेच पाहण्याकडे मुलांचा जास्त कल असतो, होता। घरात आई-वडिल, ताई-दादा, आजोबा-आजी कोणीही रागावले की मित्राकडे जाऊन किंवा मित्राला हे सर्व सांगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळूच डोळ्यात साचलेल्या आसवांना वाट मोकळी करून दिल्यानंतर मोठ्ठ दडपण कमी झाल्यासारखं पूर्वी वाटत होतं. पण आजकाल इतकं मोठं कुटुंब सुद्धा दिसत नाही, असलं तरी आता हे सर्व दृश्य बदललं असून आज वडिल सुद्धा मुलांशी मित्राच्या नात्याने वागताना दिसतात. आपले बाबा कामावरून घरी परत केव्हा येतात याची वाट आजकाल मुलं पाहतात.
दिवसेंदिवस महागाई सातत्यानेच वाढत असून मुलंही लवकर समजुतदार होत असून, आपल्या पालकांना आपणही काहीतरी हातभार लावावा आणि घर चालवण्यात खारीचा वाटा उचलावा, या उद्देशाने अनेक मुलं-मुली earn and learn अर्थातच शिक्षणाबरोबरच काहीतरी छोटे-मोठे काम करून पैसे मिळवतात. इंटरनेटमुळे तर या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे ताटातुट झालेली बहिणभावंडं इंटरनेटच्या माध्यमातून वेबकॅम, चॅटिंगच्या द्वारे दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. हो, एक मात्र आहे. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, जी-टॉक मेसेंजर याद्वारे गुगल (सर्च इंजिन), याहू, सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी खातं (ईमेल-आयडी) उघडावं लागतं हे सांगायला नकोच...। खातं या शब्दाऐवजी अकाउंट हा शब्दप्रयोग सर्वांच्या दृष्टीने सोयीस्कर वाटतो...। असं अकाउंट उघडताना ज्यांना आपल्याशी बोलण्यासाठी आमंत्रित करायचं असेल त्यांचं अकाउंट देखील आपल्या अकाउंटशी जोडणं सक्तीचं आहे. यासाठी फ्रेंड्स-अकाउंट, फ्रेंड्स ची नावं Friends Name, Friends Address, Friend List असे छानसे शब्द वापरले जातात..बहिण असो अथवा भाऊ असो..यांनाही फ्रेंड च्या यादीमध्येच जोडावं लागतं.
"फ्रेंड" या शब्दामुळे दूर गेलेली मित्रमंडळी, बहिण-भाऊ, भावंडं खरंच अगदी क्षणात जवळ येतात, कामावरचं टेन्शन असो, की घरचं टेन्शन असो, दोघेही एकमेकांना सांगून मनं मोकळी करतात. मनात काही न साचल्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा फ्रेश मुडमध्ये कामास सुरवात करू शकतात. फ्रेंड..friend..या शब्दाची फोड आपण free-end..म्हणजेच अगदी न कळत कोणत्याही तणावाचा शेवट...असा इथे समजणे वावगे ठरणार नाही।

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...