नागपूर, ता. २१- राहुल द्रविडने केलेल्या १९१ धावा आणि महेंद्र धोनी याने त्याला दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे आज भारताने ५६६ धावा करून आपला डाव घोषित केला. नागपूर येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात आज सकाळीच सचिन तेंडुलकरने अवघ्या चार धावा काढून काही मिनिटातच मैदानातून परतला. सचिन आज आपले पन्नासवे शतक झळकावणार असे सगळ्यांनाच वाटत असताना चार धावा काढून ६१ धावांवर बाद झाल्यामुळे त्याला तंबूत परतावे लागले होते. यानंतर राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सुरेख खेळून द्रविड १९१ तर धोनीने ९८ धावा काढल्या. यात द्रविड याने एकूण २१ चौकार मारून आपले एकतिसावे शतक पूर्ण केले.