जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) - सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी
महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई देवीसिंह पाटील-शेखावत यांची काही दिवसांपूर्वी
जळगाव दौर्यात भेट घेतली व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाराष्ट्रात
केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती महोदयांना माहिती दिली. त्यांच्या या स्पृहनिय
कार्याबद्दल महामहिम राष्ट्रपतींनी जाणून घेतले व कार्याबाबत समाधान व्यक्त केले.
ते जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत आहेत.
महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या गत २३ ते २५ मार्च १२ दरम्यान जळगाव दौर्यावर आल्या होत्या. किशोर कुळकर्णी यांनी राष्ट्रपती महोदयांना आपल्या कार्याबद्दल माहिती व घडवा सुंदर हस्ताक्षर पुस्तक सस्नेह देण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी महामहीम राष्ट्रपतींची भेट निश्चित झाली. या भेटीत कुळकर्णी यांनी घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत माहिती दिली. गत १७ वर्षांपासून ते शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुघड सुंदर व्हावे यासाठी निस्पृहपणे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. एकट्या धरणगावमध्ये विविध शाळांच्या सुमारे २००० विद्यार्थ्यांच्या अक्षरांना आपण वळण लावले असून त्या कार्याबद्दल त्यांचा माजी मंत्री अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते नागरी सत्कार देखील करण्यात आला होता. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. यात स्व. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन येथील शाळेत देखील त्यांनी हा उपक्रम यशस्वी राबविला असून त्याबाबत विकास आणि सौ. भारती आमटे यांनी कुळकर्णी यांच्या कार्याबाबत नोंदविलेला अभिप्राय आणि त्यांनी राबविलेल्या उपक्रमाची विविध प्रसिद्धी माध्यमात प्रकाशित बातम्या, लेख आदी साहित्य देखील राष्ट्रपती महोदयांना या भेटीत दाखविण्यात आले. किशोर कुळकर्णी यांच्या कार्याबाबत महामहिम राष्ट्रपती महोदयांनी समाधान व्यक्त केले. या भेटीत कुळकर्णी यांच्या सुविद्य पत्नी सौ. आरती कुळकर्णी देखील सोबत होत्या.