राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अकाली पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन, लवकरच पंचनामा देखील करण्यात येईल. यानंतर आर्थिक मदत देण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
अकाली पावसामुळे यंदा राज्यात ठिकठिकाणी कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागला. परिणामी ऐन हातातोंडाशी आलेला शेतकर्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला. याचबरोबर जेवणाची चवही बदलली. मध्यंतरी, कांदा ५० रुपयांपर्यंत महाग होणार, या शक्यतेने रडू कोसळले. परंतु आता मात्र शिल्लक चांगल्या प्रतीचा कांदा रुपयांची शंभरी गाठणार असल्याचे वृत्त आहे. परिणामी कांद्यामुळे रडणे सोडाच, रडून-रडून डोळेही कोरडे झाले असून कांदा विसरण्याचीच वेळ आली आहे.
गेल्या महिन्यात परतीच्या मान्सून नंतर पावसाळा संपला असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू होणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा तटवर्ती क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात अनेक ठिकाणी अकाली पाऊस झाला. परिणामी सर्वाधिक नुकसान कांदा, मिर्ची चे झाले. बाजारपेठेत जाणार असलेला आणि बाजारपेठेत जाऊन विक्रीच्या बेतात असलेला कांदा पावसात भिजला. मुसळधार पाऊस पडेल अशी सुतराम शक्यता, शंका शेतकरी व व्यापार्यांना नसल्यामुळे कांदा ओला होऊन मोठ्या प्रमाणावर कांदा फेकून द्यावा लागला आहे. यातही चांगला कांदा गवसतो का? या आशेने गरीब नागरीक चांगल्या कांद्याच्या शोधात आहेत. तोंडचा घास गेल्यामुळे कांद्याने न चिरताही डोळ्यात पाणी आणल्याची अर्थातच रडविल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.