जामनेरमध्ये होणार ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल: फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, जॉर्जिया, इराण, रोमानिया आणि एस्टोनियाचे पैलवान उतरणार
मुंबई, दि. ४ - जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव इतिहास रचण्यासाठी
सज्ज झाले आहे. येथील भूमीवर १६ फेब्रुवारी २०२५ रोजी 'नमो कुस्ती
महाकुंभ-२' सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती
दंगल आयोजित करण्यात आली आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश
देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट
आहे. या दंगलीमध्ये हिंदुस्थान , फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान,
रोमानिया, जॉर्जिया, इराण आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते,
ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि
उप-महाराष्ट्र केसरी सारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार
आहेत. हे मोठे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण
ठरणार आहे.
याबद्दल बोलताना या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचे प्रमुख
आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले कि,
संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्साह आहे. या कुस्ती
दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या
निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल
उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल सामान्य घरातील
खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल.
कुस्ती
रसिकांसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंना
एकाच मंचावर पाहण्याची ही अनोखी संधी आहे. ही स्पर्धा रविवार, १६
फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालणार
आहे. कुस्तीला समर्पित असलेले हे आयोजन जामनेर येथे मोठ्या दिमाखात पार
पडणार आहे. या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी
क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री गिरीष
महाजन यांनी केले आहे.