मुंबई, ता. २३- जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज चौधरी यांच्या निधनामुळे भक्तीच्या मार्गाने प्रबोधनाचा वारसा पुढे नेणार्या व्यक्तीमत्वाला आपण मुकलो आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की वारकरी संप्रदायाच्या शिक्षण परंपरेचा पाया घालणार्या आणि देशाला नवनवीन प्रवचनकार व कीर्तनकार देणार्या गुरुवर्य जोग महाराजांच्या संस्थेचे अध्यक्षपद चौधरी यांनी भूषविले, हेच त्यांच्या आयुष्यातील महान कार्य व महान गौरव आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेचे केलेले अत्यंत सखोल व भावगर्भ असे विवेचन हे जोग महाराज संस्थेचे वेगळे वैशिष्ट्य सांगता येईल. संस्थेच्या या वैशिष्ट्यात आणि लौकिकात मौलिक भर घालण्याचे कार्य चौधरी महाराज यांनी केले आहे.