आज कालच्या मुलांना भेसळीचे खाण्याची सवय झाली आहे, शुद्ध तुपातले अन्न खाल्ले तर, त्यांचे पोट बिघडते, अपचन होते...अशी वाक्य अनेकदा ऐकू येतात. देशातल्या अनेक भाषांच्या बाबतीतही जवळपास असेच झाले आहे. प्रामुख्याने देशात व्यवहारासाठी वापरल्या जाणार्या दोन प्रमुख भाषा मानण्यात येणार्या हिंदी आणि इंग्रजी यांचे मिश्रण म्हणजेच हिंग्लिश वापरण्याची मुभा शासनानेच आता अप्रत्यक्षपणे दिली आहे... अवघ्या दशकापूर्वी अतिशय शुद्ध स्वरूपात बोलल्या जाणार्या जवळपास अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आता इंग्रजीने शिरकाव केला आहे. देशावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांनी देश सोडून जाता-जाता चहा आणि सॉरी हे दोन शब्द इथेच सोडले, अन् बस्स...चहा नसला तर अनेकांना चुकल्यासारखे वाटणे, कामे न होणे यासारखेच अगदी भाषांचेही झाले आहे. दररोजच्या बोलण्यात, शब्दप्रयोगात इंग्रजी शब्द नसला तर चुकल्यासारखे वाटते. काही वर्षांपूर्वी मोठ्या शहरांपासून याला अप्रत्यक्षरित्या सुरूवात झाल्याचे जाणवते, नव्हे, इंग्रजी चा मोठ्या प्रमाणावर भाषांमध्ये शिरकाव होणार असल्याचे जणू ते सूतोवाच ठरले.. अनेक सुशिक्षित अथवा मोठ्या शहरांमध्ये शिकण...