मुख्य सामग्रीवर वगळा

...अखेर "हिंग्लिश" च्या पगड्याची पगडी बसली डोक्यावर!

आजकालच्या मुलांना भेसळीचे खाण्याची सवय झाली आहे, शुद्ध तुपातले अन्न खाल्ले तर, त्यांचे पोट बिघडते, अपचन होते...अशी वाक्य अनेकदा ऐकू येतात. देशातल्या अनेक भाषांच्या बाबतीतही जवळपास असेच झाले आहे. प्रामुख्याने देशात व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या दोन प्रमुख भाषा मानण्यात येणार्‍या हिंदी आणि इंग्रजी यांचे मिश्रण म्हणजेच हिंग्लिश वापरण्याची मुभा शासनानेच आता अप्रत्यक्षपणे दिली आहे...

अवघ्या दशकापूर्वी अतिशय शुद्ध स्वरूपात बोलल्या जाणार्‍या जवळपास अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आता इंग्रजीने शिरकाव केला आहे. देशावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांनी देश सोडून जाता-जाता चहा आणि सॉरी हे दोन शब्द इथेच सोडले, अन् बस्स...चहा नसला तर अनेकांना चुकल्यासारखे वाटणे, कामे न होणे यासारखेच अगदी भाषांचेही झाले आहे. दररोजच्या बोलण्यात, शब्दप्रयोगात इंग्रजी शब्द नसला तर चुकल्यासारखे वाटते. काही वर्षांपूर्वी मोठ्या शहरांपासून याला अप्रत्यक्षरित्या सुरूवात झाल्याचे जाणवते, नव्हे, इंग्रजी चा मोठ्या प्रमाणावर भाषांमध्ये शिरकाव होणार असल्याचे जणू ते सूतोवाच ठरले..

अनेक सुशिक्षित अथवा मोठ्या शहरांमध्ये शिकणारी मुलं आपसात बोलताना एखादा शब्दप्रयोग मुद्दामच इंग्रजीमध्ये करून आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असल्याचे दर्शवित असल्याचा आरोप जनसामान्यांकडून तेव्हा केला जात होता. मात्र आज राजरोसपणे इंग्रजीच्या अनेक शब्दांनी बोलीभाषेत दखल देऊन (किंवा आपल्यासारख्यांनीच आणून) प्रादेशिक भाषांवर आक्रमण केले आहे.

सध्या मिंग्लिश आणि हिंग्लिश अशा दोन उपभाषाच जणू उदयास आल्या आहेत. मराठमोळ्या संस्कृतीत केक येऊन तर थोडाफार इंग्लिश कल्चर ने प्रवेश केला होताच...त्यात भरीस भर म्हणून दररोजच्या संवादात सुद्धा इंग्रजीचा वापर करणे सुरू झाले. मराठी + इंग्लिश आणि हिंदी + इंग्लिश अर्थातच सर-मिसळ होऊन खरोखर मिसळच झाली आहे...दररोज दिवसाची 'सुप्रभातम्' ने होणारी सुरवात आता 'हाय' ने आणि शेवट 'बाय' ने होतोय, सरासरी दहा घरांपैकी आठ घरांमध्ये हेच चित्र आहे. कॉन्व्हेंट चा ट्रेंड आता झाल्यामुळे शुद्ध हिंदी, मराठीत बोलणारी मुलंसुद्धा अनेकदा इंग्रजीतले अनेक शब्दप्रयोग बोलण्यात करतात. हिंदी अथवा मराठी भाषांमध्ये इंग्रजाळलेल्या हिंग्लिश आणि मिंग्लिश यांचा पगडा नक्कीच बसला आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात इंग्रजी भाषा येणं जरी काळाची गरज ठरली असली, तरीही मराठी असो किंवा हिंदी...कोणतीही मातृभाषा काळाच्या ओघात मागे पडणार नाही, मोडी प्रमाणे मोडणार नाही, ही प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे, कर्तव्य ठरले आहे!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012