बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (संयुक्त) आणि भाजपा युतीने लढविलेल्या निवडणुकीत युतीला १८४ जागांवर यश मिळाले. विविध राजकीय पक्षांनी देखील नितीशकुमार यांना यशाचे धनी म्हणून श्रेय दिले आहे. नितीशकुमार यांच्या काळात कायदा सुव्यवस्था सुधारल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नितीशकुमार यांनी खरोखरच विकास केला असून येत्या काही वर्षात बिहार राज्याविषयी असलेली मलिन प्रतिमा पुसली जाईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. विकासाच्या राजकारणालाच नागरिकांनी कौल दिल्याचे मत भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची हॅट-ट्रिक गाठणार आहेत. यापूर्वी २००५ मध्ये देखील ते बिहारचे मुख्यमंत्री होते. परंतु २००० मध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे अवघ्या सात दिवसातच त्यांना राजीनामा देणे भाग पडले होते. अभियंता असलेले नितीश उच्च विद्या विभूषित असल्यामुळे बिहारचे दिवस नक्की बदलतील असा ज्येष्ठ नागरिकांना देखील विश्वास आहे.