मुंबई, दि. 3: अनेक अभिनव उपक्रमांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात तत्पर असणाऱ्या मुंबईकरांना 'हवाई फॉर्म्युला-1' म्हणून जगभरात लोकप्रिय होत असलेल्या 'एअरो-जीपी' या विमान स्पर्धेचा थरार या वर्षअखेरीस अनुभवावयास मिळणार आहे. या स्पर्धेचे भारतातील संयोजक असलेल्या मे. आय इंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया या कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विनावित्तीय सहकार्यासाठीचे पत्र काल प्रदान केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची आय-इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरभजन सिंग सहगल यांनी गेल्या सोमवारी या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भेट घेऊन त्यांना पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविले आणि मुंबईमध्ये या उपक्रमाच्या आयोजनासाठी एमटीडीसीकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 'इएसपीएन-स्टार' वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील 50हून अधिक देशांत या चित्तथरारक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले...