मुंबई, दि. 10:- ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दाजीकाकांच्या निधनाने संवेदनशील मनाचं, सामाजिक बांधिलकी जपणारं आणि महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाची सुवर्णमुद्रा सातासमुद्रापार उमटवणारं महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात दाजीकाकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सराफी उद्योगात ‘पीएनजी’ हा ब्रॅन्ड स्थापन करुन त्याला जगभर विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सांगली, पुणे, मुंबईसह देश-विदेशात ‘पीएनजी’च्या शाखा स्थापन करण्यात आणि याब्रॅन्डच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्यात दाजीकाकांनी मुख्य भूमिका बजावली होती. जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत असणारे दाजीकाका हे मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व होते. दाजीकाका हे मालक असले तरी व्यवस...