मुंबई, दि. 10:- ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दाजीकाकांच्या निधनाने संवेदनशील मनाचं, सामाजिक बांधिलकी जपणारं आणि महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाची सुवर्णमुद्रा सातासमुद्रापार उमटवणारं महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात दाजीकाकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सराफी उद्योगात ‘पीएनजी’ हा ब्रॅन्ड स्थापन करुन त्याला जगभर विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सांगली, पुणे, मुंबईसह देश-विदेशात ‘पीएनजी’च्या शाखा स्थापन करण्यात आणि याब्रॅन्डच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्यात दाजीकाकांनी मुख्य भूमिका बजावली होती. जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत असणारे दाजीकाका हे मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व होते. दाजीकाका हे मालक असले तरी व्यवसायातील कारागिर आणि कामगारांच्या श्रमांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. त्यामुळे आपल्या यशाचं श्रेय त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच यशात सहभागी करुन घेतलं, यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.
माणसं जोडणं, संघटना बांधणं, लोकांच्या हक्कांसाठी लढणं, संकटांच्या-अडचणींच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणं या आपल्या स्वभावगुणांमुळे त्यांनी पुणेकरांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. पुणेकरांनीही त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. अनेक मानसन्मानांनी त्यांचा गौरव केला. दाजीकाकांनी त्यांच्या पत्नी कमलाबाईंच्या निधनानंतर त्यांच्या अंगावरचे दागिने न उतरवता ते वैकुंठधामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच ठेवून देण्याचा निर्णय घेतला होता. लातूर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भरीव निधी उभारण्यातही त्यांचा पुढाकार होता. अशा अनेक घटनांमधून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी सिद्ध करुन दाखवली. त्यांच्यासारखा उद्योजक आणि उमद्या मनाचा माणूस निघून जाणं ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.