मुख्य सामग्रीवर वगळा

धुळे शहरातील रस्ते आणि रुग्णालयांसाठी महापालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई, दि.1 : धुळे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक रुग्णालयांच्या उभारणीसाठी महानगरपालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. धुळे महानगरपालिकेला अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, वित्त विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी यावेळी उपस्थित होते. धुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन 80 फुटी रोड येथे मॅटर्निटी होम; तर चक्करबर्डी परिसरात सार्वजनिक रुग्णालय बांधण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच धुळे शहरातील विविध मुख्य रस्ते तयार करण्यासाठी 10 कोटी रुपयांची गरज आहे. असे एकूण 20 कोटी रुपये महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी श्री. कदमबांडे यांनी केली. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लहान महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन शहरांच्या विकासाला गदी देण्यावर शासनाचा भर आहे. धुळ्यातील नागरी सुविधांची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामांसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल.सांगली महानगरपालिकेला दिलेल्या अनुदानाच्या धर्तीवर हा निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाईल. त्यात नगरविकास राज्यमंत्री श्री. सामंत स्वत: लक्ष घालतील.अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था झालेल्या रस्त्यांची कामे या अनुदानातूनप्राधान्याने करावीत; तसेच सर्व कामे दर्जेदारच झाली पाहिजेत. विकास आराखडा सादर करावा धुळे महानगरपालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करूनशहराचा विकास आराखडा शासनास सादर करावा. शहराच्या आवश्यकतेनुसार आराखड्यात उद्याने, क्रीडांगणे, शाळांच्या जागा, वीज उपकेंद्रांच्या जागा आदींच्या योग्य त्या आरक्षणांचा त्यात समावेश असावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले. गळती रोखल्यास भारनियमन बंद करणार धुळे शहरातील यंत्रमागधारकांची गैरसोय टाळण्यासाठी भारनियमन कमी करण्यात यावे; तसेच यंत्रमागधारकांना वीज दरात सवलत देण्यात यावी, अशी मागणी धुलिया पॉवरलूम ओनर्स ट्रेड असोशिएशनने केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात विजेची पुरेशी उपलब्धता आहे. परंतु अधिक गळती असलेल्या भागातच भारनियमन केले जाते. आपल्या असोशिएशनने आणि धुळ्यातील इतर नागरिकांनी गळती रोखण्यासाठी सहकार्य केल्यास केवळ भारनियमन कमीच नाही तर ते पूर्णत: बंद केले जाईल. तुमची तयारी असल्यास आम्ही 15 दिवसांत भारनियमन बंद करु शकतो. उपमुख्यमंत्र्यांची ही सूचना धुलिया पॉवरलूम ओनर्स ट्रेड असोशिएशनने मान्य केल्याने शहरातील गळती कमी झाल्यानंतर लगेच भारनियमन बंद केले जाईल. कबीरगंज, वळजाई रोड आणि मोहाडी फिडरमध्ये यंत्रमागधारकांची असलेली संख्या लक्षात घेऊन तिथे प्राधान्याने ही उपयायोजना केली जाईल, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील यंत्रमागधारकांना आपण वीजबिलांत जवळपास 1100 कोटी रुपयांची सवलत देतो. त्यात आणखी वाढ करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशीही माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. नवनिर्वाचित महापौर जयश्री अहिरराव आणि धुळे पंचायत समितीच्या सभापती ज्ञानज्योती भदाणे यांचा यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.माजी उपमहापौर सव्वाल अन्सारी, म्हाडाचे नाशिक विभागीय माजी सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, नगरसेवक चंद्रकांत केले, मनोहर भदाणे आदी यावेळी उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...