मुख्य सामग्रीवर वगळा

रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्यांचा भरती प्रक्रियेत विचार करणे बंधनकारक - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 7: शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांनी भरती प्रक्रिया राबविताना रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांचाही विचार करणे कायद्याने बंधनकारक आहे; तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागाला आपले वार्षिक वित्तीय अंदाजपत्रक सादर करताना त्यात ‘रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती बजेटचा समावेश करणे अनिवार्य केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांबाबत रोजगार व स्वयंरोजगार विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाचे मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सादरीकरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विधिमंडळ सदस्यांच्या समितीचे अध्यक्ष तथा रोजगार व स्वयंरोजगार राज्यमंत्री संजय सावकारे, समितीचे सदस्य श्री.सुधीर मुनगंटीवार, श्री. सुरेश हाळवणकर, श्री. विनायक मेटे, डॉ. सुधीर तांबे, प्रा. सुरेश नवले, डॉ. दीपक सावंत, वित्त विभागाचे सचिव राजेश अगरवाल, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाचे आयुक्त विजय कुमार गौतम आदी यावेळी उपस्थित होते. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या वेळी प्राधान्य देणे खासगीसह सर्वच आस्थापनांना बंधनकारक आहे. त्यासंदर्भातला विशेष कायदा अस्तित्वात आहे. त्याचे उलंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, या कायद्याचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. भरती प्रक्रियेत केवळ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांचाच समावेश करावा, असा आग्रह नाही; परंतु इतर उमेदवारांबरोबरच याही उमेदवारांचा विचार झाला पाहिजे. सर्वांसाठीच परीक्षा किंवा चाळणी प्रक्रिया राबवून पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करावी. याबाबत रोजगार व स्वयंरोजगार विभागाने सर्व संबंधितांना स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कृषी प्रक्रिया उद्योग, ऑटोमोबाईल, बँकिंग, वित्त आणि विमा, बांधकाम, आरोग्य, माहितीतंत्रज्ञान, रिटेल, फार्मासिटिकल आणि केमिकल, वस्त्रोद्योग आदी निवडक 11 क्षेत्रांमध्येसन 2022 पर्यंत 5 कोटी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. शिवाय राज्यात 15 ते 44 वयोगटातील लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, अशी माहिती श्री. गौतम यांनी दिली. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, या अनुकूल परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाला आपल्या वार्षिकवित्तीय अंदाजपत्रकात ‘रोजगार स्वयंरोजगार निर्मितीब जेट’ या घटकाचा समावेश करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात येतील. त्याचबरोबर राज्याच्या उद्योग, पर्यंटन, महिला व बालविकास, क्रीडा, शिक्षण आदी धोरणांमध्येही रोजगार, व स्वयंरोजगारनिर्मिती च्या तपशिलाचा; तसेच त्याबाबतचे नियोजन, कार्यवाही आणि कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील. त्याचबरोबर बेरोजगारी दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.रोजगार व स्वयंरोजगार विभागाने बेरोजगारी दूर करण्यासाठी नव्या संकेतस्थळासह विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांची संख्या, रोजगारांची उपलब्धता, उपलब्ध झालेले रोजगार आदींची अद्ययावत माहिती आपल्याला मिळू शकणार आहे. बेरोजगारांची आता सेवाकेंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ही नोंदणी करता येते. त्यामुळे सेवा योजन कार्यालयात रांगा लावण्याची आश्यकता नाही. सादरीकरणातील ठळक मुद्दे व निर्णय:- • बेरोजगारांची कौशल्यक्षमता चाचणी घेऊन गरजेनुसार प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे ‘व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रांमध्ये रुपांतर करणार. • राज्यातील निवडक 5 जिल्ह्यांमध्ये पथदर्शी योजने अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. • बेरोजगार उमेदवारांना रोजगारानुरुप कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्कील व्हाउचर्स योजना’ राबविणार. • राज्यात खाजगी प्लेसमेंट एजन्सीच्या कामकाजाचे नियमन करण्यासाठी कायदा करण्या संदर्भात कार्यवाही करणार. • अनुसूचित जातीजमातीच्या उमेदवारांसाठीच्या ‘स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजने’त सुधारणा करणार. • रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी करिअर ग्रंथालय व अभ्यासिका योजनेस आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. • बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना विनानिविदा 5 लाख रुपयांपर्यंत ची कामे देण्याची मर्यादा वाढवून देण्यात येईल. • रोजगार नोंदणी आणि विविध आस्थापनांना पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे www.maharojgar.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...