मंगळवार, २४ मे, २०११

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री

'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर तसेच दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळ     
मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदारांसाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात येण्याची विनंती पवार यांनी निर्मात्यांना केली. यावेळी अनंत महादेवन म्हणाले की, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यानंतर आज मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरला आहे. दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीमुळे मराठी चित्रपट रसिक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळायला लागले आहेत. परदेशात देखील चित्रपटांना प्रतिसाद मिळात आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री


मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदारांसाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात येण्याची विनंती पवार यांनी निर्मात्यांना केली. यावेळी अनंत महादेवन म्हणाले की, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यानंतर आज मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरला आहे. दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीमुळे मराठी चित्रपट रसिक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळायला लागले आहेत. परदेशात देखील चित्रपटांना प्रतिसाद मिळात आहे.

'जातिनिहाय जनगणनेला नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे' : भुजबळ

मुंबई 23 : गेली 80 वर्षे प्रलंबित असलेली जातवार जनगणनेची मागणी केंद्र सरकारने मंजूर केली असून त्याचे प्रत्यक्ष काम येत्या एक जूनपासून सुरू होणार असून या कामी समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केले. समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बांद्रा येथील एम.ई.टी.मध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, यापूर्वीची जातिनिहाय जनगणना सन 1931मध्ये झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात यंदा प्रथमच होणाऱ्या जातिनिहाय जनगणनेमुळे जातवार शिक्षण, नोकऱ्या, निवारा, आरोग्य, मूलभूत सोयीसुविधा, आर्थिक, सामाजिक स्थिती यांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्या आधारे पुढील विकास योजना आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाची धोरणे आखली जातील. त्यानुसार राज्यवार व देशाच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी, भटके विमुक्त आणि आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या समाजघटकांना न्याय मिळण्याचे दरवाजे उघडले जातील.
समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनगणनेला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करावे; तसेच, हे काम सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली.
या बैठकीमध्ये जातिनिहाय जनगणनेची मागणी मंजूर करून घेतल्याबद्दल श्री. भुजबळ यांचे अभिनंदन करण्यात आले. लोकसभेत ही मागणी सर्वप्रथम मांडल्याबद्दल खासदार समीर भुजबळ यांनाही धन्यवाद देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या 10 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या मागासवर्गीयांच्या हक्काच्या सनदेच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीला खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, जयंत जाधव, प्रा. हरि नरके, डॉ. कैलास कमोद, माजी आमदार लक्ष्मण तायडे, संदेश कोंडविलकर, वसंत वाणी, डॉ. संजय गव्हाणे यांच्यासह सुमारे 125 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवार, २३ मे, २०११

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव: अजित पवार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे राज्याच्या कलाक्षेत्राचा गौरव झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
श्री. पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, अठ्ठावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचा वरचष्मा आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिमाखदार कामगिरीमुळे मला आनंद झाला आहे. अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वगायन, निर्मिती या क्षेत्रातील मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या दमदार कामगिरीमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणात्मकतेवर राष्ट्रीय मोहोर उमटली आहे.

संतांनी समाज घडविण्याचे कार्य केले- छगन भुजबळ

कोरेगाव भीमा - संतांनी समाज घडवण्याचे मोठे काम केल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्या अखिल भारतीय बहुजन संत साहित्य महासंमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.
वाघोली (ता. हवेली) येथे भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महासंमेलनाचे उद्‌घाटन आज श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष सत्यपाल महाराज, प्रीतिसुधाजी महाराज, आमदार अशोक पवार, सौ. कमलताई ढोले पाटील, प्रा. हरी नरके, प्रा. लक्ष्मण मुंजाळे, डॉ. अजित नदाफ, पी. रघुनाथ, अशोक शहा, अरुण बुर्गाडे, प्रा. दगडे, प्रा. रमणलाल सोनग्रा, महादेव तरवडेकर, श्रवणकुमार महेंद्रकुमार, तसेच स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, शिवदास उबाळे, मुख्य प्रवर्तक महेंद्र धावडे, अमित वाघोलीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, प्रदीप कंद, अशोक सावंत, रामदास दाभाडे, शंकर भुमकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री.भुजबळ म्हणाले, 'पर्यावरणाचा सामाजिक संदेश संत तुकाराम महाराजांनीच आपल्या अभंगातूनही दिला, तर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम संत सावता माळी यांनी केले. संतसाहित्याच्या प्रसारासाठी "फेसबुक'सारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांचा वापर करावा.''
प्रीतिसुधाजी महाराज यांनी, जातीभेद नष्ट झाला पाहिजे, असे मत व्यक्त करून गोहत्येवरही कडक शब्दांत टीका केली.
हनुमंत उपरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. धावडे यांनी केले. सूत्रसंचालन दिगंबर लोहार यांनी केले, तर आभार सोमनाथ भुजबळ यांनी मानले.

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 20 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या चौपदरीकरणाचे काम येत्या अडीच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईलच, पण तोपर्यंत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संबंधित विभागाने आपापले काम जबाबदारीने करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केली. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात, नागरिकांची सुरक्षा आणि चौपदरीकरणाच्या अनुषंगाने गेल्या 11 मे रोजी श्री. भुजबळ यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत सामोऱ्या आलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्यांनी आज ही बैठक बोलाविली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव भूषण गगराणी, पोलिस महानिदेशक (वाहतूक) श्री. शर्मा, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. मंडपे यांच्यासह कोकण विभागातील वन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, गृह विभागांचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, या प्रकरणी प्रत्येक जणच आपल्यावरची जबाबदारी झटकून मोकळा व्हायला पाहतो आहे. असे कसे चालेल? मला सुध्दा केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलता येते; पण, माझ्या राज्यातली माणसं मरत आहेत, म्हणून वेदना होताहेत. राज्यातल्या कुठल्याच रस्त्यावर एकही माणूस अपघातात मरता कामा नये, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. ते अशक्यप्राय असले तरी त्या दृष्टीने प्रयत्न करणे, योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे, या गोष्टी तरी आपल्या हातात आहेत. त्या करण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन भुजबळ यांनी केले.
श्री. भुजबळ यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या 33 हेक्टर वनजमिनीच्या संदर्भात वेळोवेळी उपस्थित करण्यात आलेल्या शेऱ्यांवर समाधानकारक पूर्तता केल्यानंतरही वर्गीकरणाचा प्रश्न अद्याप अलिबाग आणि रोहा येथील उप वनसंरक्षक यांच्याकडे प्रलंबित असून ते काम तातडीने करण्याची सूचना केली. यावेळी वनजमीन हस्तांतरणाला गती देण्यासाठी गुजरात सरकारने कायद्यात सुधारणा केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर संबंधित कायद्याचा अभ्यास करून आपल्या राज्यात त्याची अंमलबजावणी करता येईल का, यादृष्टीने चाचपणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.
रायगड जिल्ह्यातील एकूण 67 गावांपैकी आजपर्यंत केवळ 12 गावांतीलच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही श्री. भुजबळ यांनी दिले. त्यावर निवाडे आणि निधी उपलब्धता यांच्या संदर्भातील पूर्तता करून येत्या दोन महिन्यांत या गावांतील भूसंपादनाची सर्व प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर लांबीत खात्याकडे 30 मीटर रुंदीची जागा उपलब्ध आहे. या रुंदीत वेगमर्यादा, ध्वनिमर्यादा तसेच भौमितिक मापदंडात मर्यादा घालून चारपदरी रुंदीकरण शक्य आहे. त्यादृष्टीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वनविभागाला प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.
इंदापूर ते झाराप या 366 किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या 15 दिवसांत त्याचा डी.पी.आर. केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्री. भुजबळ यांना देण्यात आली.

धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेसाठी...
महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची यादी संबंधितांकडून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी त्या सर्व ठिकाणी आपल्या अखत्यारीतील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावेत, असे आदेश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. पावसाळयापूर्वी महामार्गाच्या बाजूपट्टया उत्तम प्रकारे भरून घ्याव्यात, ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी वाहनांची गती कमी करण्यासाठी आधुनिक गतिरोधक 15 दिवसांच्या आत बसवावेत, असे आदेशही त्यांनी दिले.
वडखळ येथील महामार्गावरील अतिक्रमणे दूर करावीत, शक्य असेल तर त्याठिकणी रुंदीकरण करावे तसेच दुभाजक बसवावेत. त्याचप्रमाणे तेथे मागील बाजूने पर्यायी मार्गाची सोय करता येणे शक्य असल्यास ते कामही तातडीने करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

अपघात कमी करण्यासाठी...
या महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीनेही श्री. भुजबळ यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले, गेल्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात जसे कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभे करून लहान वाहने जशी पुढे काढली जातात, तशाच पध्दतीने सुटीच्या हंगामात सुध्दा ही मोहीम राबविता येऊ शकेल. त्याचप्रमाणे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुध्दही तपासणी मोहीम उघडावी, तसेच असे तपासणी नाके वाढवावेत. महामार्ग पोलिसांनी गतिमापक यंत्रे (स्पीडगन) उपलब्ध करण्याबरोबरच गस्ती वाहनांच्या संख्या आणि फेऱ्या वाढविण्याचीही सूचना त्यांनी केली. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे धोरण स्विकारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यासाठी भाडोत्री का असेना, पण तातडीने खाजगी क्रेनची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गावर वैद्यकीय सेवा उपलब्धतेसाठी...
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड, संगमेश्वर आणि कळंबी येथील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने कार्यान्वित करण्याची गरज श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली. त्यावर महाड आणि कळंबी येथील सेंटर्स तातडीने सुरू करण्यात येतील, मात्र संगमेश्वरला थोडा अधिक वेळ लागणार असल्याची माहिती श्री. गगराणी यांनी श्री. भुजबळ यांना दिली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राज्याला 950 ऍम्ब्युलन्स मंजूर करण्यात आल्या असून त्यातील 72 कोकणासाठी मिळणार आहेत. तथापि, अद्याप निविदा प्रक्रिया सुरू असल्याने त्या येण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे तातडीच्या प्रसंगी स्थानिक पातळीवर भाडोत्री ऍम्ब्युलन्सची सोय करण्यात येऊ शकेल, असेही गगराणी यांनी सांगितले.

शुक्रवार, २० मे, २०११

हवेत उडणारे आले जमिनीवर...

तीव्र उन्हाचेचटके झाडावरही बसू लागल्यामुळे अखेर हवेत उडणार्‍यांनाही जमिनीवर यावेच लागले...

सिडकोची साडेबारा टक्के भूखंड वाटप संगणकीय सोडत संपन्न

नवी मुंबई, ता. १९: येथील मौजे-उलवे नोडमधील भूमीपुत्रांसाठी साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत यापूर्वी अंतिम केलेल्या ज्येष्ठता यादीनुसार नुकतीच सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांच्या उपस्थितीत निर्मल-नरिमन पॉईंट येथे संपन्न झाली.
उलवे विभागातील संगणकीय सोडतीला सिडको अध्यक्ष नकुल पाटील,  नगर विकास विभागाचे मुख्यसचिव टी. सी. बेंजामिन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त भास्कर वानखेडे उपस्थित होते. उलवे सोडतीच्या निकालाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या भूखंडांची इरादापत्रे ८ दिवसात रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात येतील. नागरिकांच्या माहितीसाठी सोडतीच्या निकालाची यादी सिडको भवन, तळमजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व सिडकोच्या www.cidcoindia.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी सूर्यकांत राठोड यांच्याशी ०२२-६७९९ ८६६४ येथे तसेच सिडको भवन, सातवा मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ येथे संपर्क साधावा.

गुरुवार, १९ मे, २०११

अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी नगरपालिकांना पाच टक्के अनुदान: उपमुख्यमंत्री

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई ता. १९ - मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे पाच टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
नुकतीच मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मत्स्यविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री भास्कर जाधव तसेच मत्स्यविकास आयुक्त हणमंतराव पवार आदी वरिष्ठ उपस्थित होते.
यावेळी श्री. पवार म्हणाले, की राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये अद्ययावत मासळीबाजार उभारण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. हा बाजार उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची कमाल मर्यादा असून यापैकी ९० टक्के रक्कम राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ देते तर उर्वरीत १० टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना भरावी लागेल. या १० टक्क्यांपैकी केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींना राज्य शासन ५ टक्के रक्कम अनुदान स्वरुपात देणार आहे. महानगरपालिकांना मात्र १० टक्के रक्कम स्वतः उभारावी लागणार आहे.
अशा प्रकारचा मासळी बाजार उभा करण्यासाठी राज्यातील मुरबाड, कुळगाव-बदलापूर, बारामती, डहाणू नगरपालिकांनी तसेच वसई-विरार महानगरपालिकेने बोळींज, आगाशी, जुचंद्र येथे तसेच पुणे महानगरपालिकेने गणेश पेठ येथे हा बाजार उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या बाजार उभारणी प्रकल्पांसाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. यापैकी मत्स्यिकी विकास मंडळ १७ कोटी ९० लाख रुपये अनुदान स्वरूपात देणार आहे.
भारतात दरवर्षी प्रतिमाणसी केवळ ४ किलो ८०० ग्रॅम मासळी खाल्ली जाते. जपानमध्ये हे प्रमाण ७५ किलो, चीनमध्ये २५ किलो तर अमेरिकेत २२ किलो ६०० ग्रॅम इतके आहे. भारतात मासळी उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन निर्यात होते, तर उर्वरीत ८५ टक्के उत्पादनाचा उपयोग खाद्यान्न म्हणून केला जातो.

सोमवार, १६ मे, २०११

कोकणच्या समुद्रकिनार्‍यांची भुजबळांनी केली हवाई पाहणी


मुंबई, ता. १३ - राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीची हवाई पाहणी केली.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा वैभवशाली समुद्रकिनारा लाभला आहे. ही किनारपट्टी म्हणजे कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासाची गुरूकिल्ली आहे. हीच बाब हेरून श्री. भुजबळ यांनी कोकणच्या विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते.
श्री. भुजबळ यांनी मांडवा, किहीम, रेवस, जयगड किल्ला जयगड जेटी, कुणकेश्वर येथील केशवसुत स्मारकाची पाहणी केली. याचबरोबर गणपतीपुळे येथील मंदीर व परिसर तसेच तेथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थेचीही पाहणी केली.

बुधवार, ११ मे, २०११

मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून 15 दिवसांत अहवाल सादर करा: भुजबळ


मुंबई, दि. 11 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17वर सातत्याने होत असलेल्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या संपूर्ण महामार्गाची जाता-येता अशी दुतर्फा पाहणी करून 15 दिवसांच्या आत तपशीलवार अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले. सदर पाहणी करत असताना संबंधित जिल्ह्यातील अभियंत्यांनाही सोबत घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे, महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होत असलेला जनक्षोभ लक्षात घेऊन श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयात संबंधितांची तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत श्री. भुजबळ यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाशी तसा थेटपणे संबंध नसतानाही त्या कामात होणाऱ्या दिरंगाईबद्दल नागरिकांच्या नाराजीला राज्य शासनाला तोंड द्यावे लागते आहे, असे भुजबळ यांनी सुनावले. 'माणसं मरत असताना आपण केवळ बघ्याची भूमिका घेत आहात. या बाबीकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे,' अशी भावना व्यक्त केली.
या राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा करारनामा 22 जानेवारी 2011 रोजी करण्यात आला असून या दिनांकाच्या सहा महिन्यात आर्थिक ताळेबंद (Financial Closure) झाल्यानंतर येत्या जुलैअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. या टप्प्यातील चौपदरीकरणासाठी 67 गावांतील 170 हेक्टर जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. आतापर्यंत या 67 गावांपैकी केवळ 10 गावांचे ऍवॉर्ड तयार झालेले असून अद्यापही 57 गावांचे ऍवॉर्ड तयार करण्याचे काम सुरू असल्याचे ऐकून श्री. भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे या चौपदरीकरणाच्या कामासाठी एकूण 33 हेक्टर वनजमिनीचे संपादन आवश्यक होते. त्यापैकी अलिबाग वनविभागाकडील 26.604 हेक्टर वनक्षेत्र आणि रोहा वन विभागाकडील 6.403 हेक्टर वन जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव एन.एच.ए.आय.ने अलिबाग व रोहा वनविभागाकडे सन 2007मध्येच सादर करण्यात आलेला आहे. त्यांनी काढलेल्या शेऱ्यांची वेळोवेळी पूर्तता करण्यात येऊनही आणि सातत्याने पत्रव्यवहार केल्यानंतरही त्यांच्याकडून अद्याप हा प्रस्ताव नागपूर वनविभागाला सदर करण्यात आलेला नसल्याचे ऐकताच श्री. भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यासंदर्भात सर्व संबंधित महसूल व वन विभागाचे अधिकारी, मुख्य सचिव, सचिव यांच्याशी चर्चा करण्याचे त्याचबरोबर सदर रस्त्याच्या परिस्थितीबाबत आणि अपघातांबाबत वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या कात्रणांसह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री, वन विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देश श्री. भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम सचिवांना दिले.
यावेळी भुजबळ यांनी जिल्हा वाहतूक पोलिसांकडूनही अपघात रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयी जाणून घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरीकरण झालेल्या मार्गावर साईडपट्टया नसल्यामुळे वाहने कलंडून अपघात होतात, अशी माहिती त्यांना देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात 41 किलोमीटरपैकी 22 किलोमीटरचे जे काम पूर्ण झाले आहे, त्या टप्प्यातील साइडपट्टयांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे आवश्यक त्या सर्व ठिकाणी गतिरोधक, दुभाजक, दिशादर्शक फलक, संकेतचिन्ह फलक, धोक्याची सूचना देणारे फलक आदींचीही तातडीने उभारणी करण्यासही त्यांनी सांगितले.
अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी क्रेन भाडयाने घ्यावी लागत असल्यामुळे किंवा तातडीने उपलब्ध न झाल्यामुळेही वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयाशी बोलून तोडगा काढावा किंवा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तातडीची गरज म्हणून एखादी तरी क्रेन ठेवता येईल का, याविषयी चाचपणी करावी, अशी सूचना त्यांनी श्री. सरंगी यांना केली.
महामार्गावर पोलिसांच्या संख्या वाढविणे गरजेचे असले तरी तातडीच्या प्रसंगी स्थानिक पोलिसांचे सहकार्य वाहतूक पोलिसांनी घ्यावे, असे श्री. सरंगी यांनी यावेळी सुचविले.

'वेगनियंत्रणासाठी स्पीड मोजणाऱ्या कॅमेऱ्यांचा पर्याय उपयुक्त!'
महामार्गावर होणारे अधिकतर अपघात हे अतिवेगामुळेच होत असल्याची माहिती श्री. भुजबळ यांना यावेळी देण्यात आली. त्यावर महामार्गावर साधारण प्रत्येक 50 किलोमीटरच्या अंतरावर स्पीड मोजणारे कॅमेरे बसविण्याचा पर्याय उपयुक्त वाटतो, तसे करता येईल का, त्याचप्रमाणे वाहनचालकांच्या मद्यचाचणीसाठी महामार्गावर 8 ते 10 ठिकाणी तपासणी केंद्रे उभारता येतील का, याविषयी महामार्ग पोलिसांनी चाचपणी करावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली.

'रात्रीच्या वेळी कंटेनर रस्त्याकडेला थांबविता येतील!'
मोठमोठया कंटेनरमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे गणेशोत्सव काळात ज्याप्रमाणे असे कंटेनर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला थांबवून लहान वाहने पुढे काढली जातात. त्याच धर्तीवर सुट्टीच्या हंगामासाठी सुध्दा अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

"सौर ऊर्जा निर्मिती" ठरणार काळाची गरज...

महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वीजेचे संकट उभे आहे. वीज कंपनीचा वाढत असलेला तोटा आणि सातत्याने वाढणारा वीजेचा दर ग्राहकांवर लादला जात आहे. यावर पर्याय म्हणून लवकरच "सौर ऊर्जा" ही काळाची गरज ठरणार आहे.

रेडिओ, फ्रीज, कूलर, फोन, मोबाईल या चैनीच्या वाटणार्‍या पूर्वीच्या वस्तू आज काळाची गरज ठरल्या आहेत. सध्या महाग आणि चैनीची वाटत असली तरीही "सौर ऊर्जा" (अर्थात सोलर एनर्जी) ही काळाची गरज नक्कीच ठरेल...
कोकणातील रत्नागिरी नजीक ९,९०० मेगावॉट क्षमतेचा आणि जगातील सर्वात मोठा मानला जाणारा नियोजित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मार्च ११ ला जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ८.९ रिश्टर स्केल असून यानंतर आलेली त्सुनामी लाट यामुळे झालेल्या नुकसानीतून आता तीन महिने उलटूनही देश पूर्णपणे सावरलेला नाही. आणखी भूकंप होऊन आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती लोकांच्या मनातून गेलेली नाही. वास्तविक जपान हा देश तंत्रज्ञानात अग्रेसर असून स्थिरचित्ताने शांततेने निर्णय घेण्यासाठी या देशाचा नावलौकिक आहे. सुमारे ४८ फूट उंचीच्या एका लाटेने फुकुशिमा येथील तीनपैकी एका अणुभट्टीला तडाखा दिल्याने या भट्टीतून किरणोत्सर्ग होऊन या किरणोत्सर्गाचे अत्युच्च पातळी गाठलेले पाणी प्रशांत महासागरात देखील गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. कारण काहीही असले तरीही नुकसान झाले आहे हे नक्की!

नियोजित जैतापूर अणुप्रकल्प सुद्धा सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. या प्रकल्पामुळे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्त होणार असल्याचे स्थानिक जनतेचे मत आहे. जपानच्या फुकुशिमा अणुभट्टीचे उदाहरण भारतानेही डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. भविष्यातील भूकंपाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मध्य जपानमधील हामाओका अणुप्रकल्प बंद करण्याचा आदेश नुकताच पंतप्रधान नाओटो कान यांनी दिला आहे. हा आदेश व घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा, लक्षवेधी आहे. मानव निसर्गाच्या सामर्थ्यापुढे टिकू शकत नाही ही बाब आता तज्ज्ञांनाही मानावीच लागेल. तरी सुद्धा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास रिश्टर स्केल ९.० तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाल्यास, त्सुनामी आल्यास जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून किंवा याचे प्रमाण शक्य तितके कमी होण्याच्या उपाययोजना अगोदर करून त्याचे प्रयोग, प्रात्यक्षिक करणे अत्त्यावश्यक आहे. देशात सध्या बहुतांशी वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमती वाढत आहेतच. वीज निर्मितीसाठी पुरवला जाणारा कोळसा, त्याची उपलब्धता, गुणवत्ता इ. बाबी फारशा गांभीर्याने घेतल्या जाताना दिसत नाहीत. परिणामी उपलब्ध होणार्‍या कोळशातून बराच कोळसा वाया जातो, फेकून द्यावा लागतो अशी वीज निर्मिती केंद्रांची ओरड असते. लोकसंख्या वाढीबरोबर वीजेची मागणी देखील वाढतच जाणार हे नाकारले जाऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षात वीज महाग झाली असून सततच्या भार-नियमनामुळे अनेक वीजग्राहक वीजेची बिलं भरेनासे झाले असून 'वीज द्या- बिल घ्या' असा अनेकांचा सूर आहे, याचबरोबर वाढत्या थकीत बाकीमुळे वीज कंपनीचा तोटा वाढतो आहे. हा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे दिसते. अनेक शासकीय, निमशासकीय संस्थांकडे वीजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वीज चोरीकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करावे लागत असल्याचे काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

लवकरच वीज किमान ८ टक्क्यांनी महाग होणार असल्याचे वीज नियामक आयोगाने सूचित केले आहे. ठिकठिकाणच्या ट्रान्सफार्मरला लागणारे इंधन देखील महाग झाले आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी जास्त होत असून ग्रामीण भागात विशेषतः शेतीला जास्त पाण्याची आवश्यकता असते, परंतु किमान बारा तासांच्या भार-नियमनामुळे, अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काही वेळा तर पीक हातचे जाण्याच्या, जळण्याच्या आणि शेतकरी बांधवांचा हाती आलेला घास पुन्हा पडत असल्याच्या घटना घडतात.

सोमवार, ९ मे, २०११

नवी मुंबई येथे १० मे स सिडकोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

मुंबई, ता. ९ - सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२० जयंती कार्यक्रम होईल. सिडको एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस मिलिंद बागूल अध्यक्षस्थानी व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील.
मंगळवारी (ता. १० मे) सिडको सभागृह, सिडको भवन, सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक व्यवस्थापक अनिता पगारे, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, व्यवस्थापकीय संचालक सिडको तानाजी सत्रे, विधान परिषद सदस्य व संचालक-सिडको सुभाष भोईर, संचालक सिडको नामदेव भगत, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल उपस्थित राहतील, असे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

गोंदे ते पिंपळगाव टप्प्याचे बहुतांश काम आगामी सहा महिन्यात पूर्ण: भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी) - आगामी सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गोंदे ते पिंपळगाव या साठ किलोमीटरपैकी पंचेचाळीस किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण पूर्ण होणार असून उर्वरित पंधरा किमी अंतरावरील काम जून २०१२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यामुळे मुंबई ते धुळे जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमेपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग आगामी दीड वर्षाच्या आत चौपदरी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे नाशिकच्या पालकमंत्र्यांचे आवाहन


नाशिक (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी लागणार्‍या जमिनीच्या भूसंपादनात प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, राजकीय आकसापोटी विकासकामांना खीळ बसेल असे प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मुंबई आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा आढावा घेताना पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते.
ते म्हणाले, की प्रत्येकाला विकास हवा आहे. विकास कामांमुळे जमिनीचे भाव वधारतात. शासनाला एक इंचही जमीन विनाकारण नको आहे. शेतकर्‍यांनी योग्य त्या मोबदल्यात विकासकामांना सहकार्य करावे. विकासाची खरी बाजू जनतेसमोर आणून शासकीय यंत्रणेच्या चुका निदर्शनास आणून देण्याचे आवाहन यावेळी श्री. भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना केले. भूसंपादनापोटी काही ठिकाणी शेतकर्‍यांना एकरी ६५ लाखापर्यंत भाव देऊनही मोर्चे निघणे ही बाब भूषणावह नाही. आजही कारखानदारांची पहिली पसंती पुण्याकडे आहे कारण तिथे मूलभूत सुविधांचा विस्तार झाला आहे.

लातूर-औसा-लामजना राज्यमार्गाची दुरुस्ती 5 जूनपूर्वी झालीच पाहिजे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 4 मे : लातूर-औसा-लामजना या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचे काम येत्या 5 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले.
या रस्त्याच्या कामाबाबत आज भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बसवराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औसा-लातूर हा 19 किलोमीटरचा चौपदरी तर औसा-लामजना हा 13 किलोमीटरचा दुपदरी मार्ग आहे. या मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचे फलक, दिशादर्शक बसविण्याची सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

'जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरा'
यानंतर झालेल्या अन्य एका बैठकीमध्ये श्री. भुजबळ यांनी डयुरोफ्लेक्स हे जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरून पाहण्याची सूचनाही सार्वजनिक बांधकाम सचिवांना केली.
सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामातील एकूण लांबीपैकी एका भागातील काही लांबीमध्ये नियमित डांबरीकरण आणि 2 ते 3 किलोमीटर लांबीमध्ये 'डयुरोफ्लेक्स'चा प्रायोगिक तत्त्वावर वापर करावा आणि पावसाळयानंतर या ऍडिटिव्हच्या उपयुक्ततेबाबत अहवाल सादर करावा, अशी सूचना सर्व मुख्य अभियंत्यांना करण्यात यावी, असे निर्देशही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले.

खतवाटपाच्या नियोजनाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी - छगन भुजबळ

नाशिक - "देशभरातच खतांची अडचण असून, केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या खताचे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वितरण होण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी,' असे स्पष्ट आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात आज नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा व नियोजनाची बैठक झाली. त्यात श्री. भुजबळ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, खासदार हरिश्‍चंद्र महाले, प्रतापदादा सोनवणे, समीर भुजबळ, राज्याचे कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्यासह पंधरा तालुक्‍यांतील आमदार तसेच अधिकारी उपस्थित होते.
अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत, खतांचे वितरण, अपघात विमा योजना, ट्रॅक्‍टरचे अनुदान, तेल्या रोगावरील रखडलेले अनुदान या विषयावरील विविध प्रश्‍न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले.

आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल यांनी खतांसंबंधी प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले, ""खतांच्या विक्रीतील लिंकिंग थांबली पाहिजे. खतांबाबत अधिकारी परस्पर कोटे ठरवून मोकळे होतात. त्यामुळे सहकारी सोसायट्यांना खते मिळत नाही. व्यापाऱ्यांकडून मात्र अव्वाच्या सव्वा दराने शेतकऱ्यांना खते घ्यावी लागतात. खत कंपन्या डिलरलाच थेट खते देतात. कंपन्यांना, सहकारी संस्थांना खते देण्यात त्यांना स्वारस्य नसते. नाशिकच्या तुलनेत जळगाव व नगरला जास्त खतपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.''
श्री. भुजबळ म्हणाले, ""देशातच खतांचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. यावर राज्य व जिल्हा पातळीवर व्यवस्थित नियोजन होणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यासाठीचे खत केंद्राकडून आल्यावर ते माथाडी कामगारांकडून विनाविलंब उतरवले गेले पाहिजे. म्हणजे खताची पळवापळवी होण्याची शक्‍यता राहणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत कंपन्यांची मनमानी मोडून काढावी.''

श्री. कोकाटे म्हणाले, ""शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने नाशिक शहरातील स्वत:ची जागा या प्रकल्पासाठी ठेवावी.''
श्री. कोतवाल यांनी यासाठी बाजार समित्यांमध्येही स्वतंत्र व्यवस्था करणे शक्‍य असल्याचे सांगितले.
दरम्यान, अवकाळीतील प्रलंबित मदत, अपघात विमा मिळण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, तेल्या रोगाचे चार वर्षांपासून रखडलेले अनुदान याबाबत लोकप्रतिनिधींमधून प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास मोते यांनी प्रास्ताविक केले व कृषी विभागाच्या नियोजनाचे सादरीकरण केले. या वेळी आरोग्य पत्रिका व जमीन सुपीकता निर्देशांकाच्या अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.

रविवार, ८ मे, २०११

एक+विसाव्या शतकातली आई आणि एक+विशीतली मुलं...

सोळावं वरीस धोक्याचं गं बाई..सोळावं वरीस धोक्याचं! असं अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हटलं जात होतं. मात्र एकविसाव्या शतकात सोळाव्या वर्षी मुलांना बर्‍यापैकी समज येते आणि एकवीस वर्षांचा मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असतो. एकविसाव्या शतकातली आई सुद्धा मुलाने चांगला उद्योग-धंदा करून नावलौकिक प्राप्त करावा किंवा चांगली नोकरी करून लवकरच एखादी सुन घरी येण्याची स्वप्न पहाते. हेच मुलींच्या बाबतीतही लागू होते. मात्र, मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली, की तिचं एखादं छान स्थळ पाहून लग्न लावून जबाबदारीतून मोकळं कधी होऊ? याचा विचार कायम आई करत असते.
आईचं महत्व काय आहे? हे सांगण्याची विशेष गरज नाही. परंतू दिवसेंदिवस मुलांकडे नीट लक्ष देण्याची आणि त्यांना सुसंस्कारित करण्याची आईची जबाबदारी वाढते आहे. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा अशा घोषणा करणार्‍या सरकारने घोषणे पलिकडे काहीच न केल्यामुळे युवक मंडळी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात एमएनसी अर्थातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन/कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी जवळपास प्रत्येकाचाच कल असतो. कारण अगदी जोरात सुरू असलेले खाजगी क्षेत्रातील व्यवसाय, कारखाने बव्हंशी बंदही पडू शकतात असे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. मात्र ग्लोबलायझेशनच्या या दुनियेत कॉर्पोरेट सेक्टरला चांगले दिवस आले असल्याचे दशकापासून दिसून येते.
लठ्ठ पगार देऊन पात्र उमेदवारांना इथे नोकरीसाठी आकर्षित केले जाते. चांगल्या गुणवत्तेच्या तरूणांना तर याचा लाभ होतोच. मात्र कॉर्पोरेट क्षेत्रात कामासाठी तितकेच पिळूनही घेतले जात असल्याची उदाहरणे आहेत. सरासरी दिवसाचे आठ तास काम आणि पाच दिवसांचा आठवडा असे एकूण चाळीस तास फक्त काम असल्यामुळेही काही आळशी पण हुशार मंडळींचे चांगलेच फावते. मुलगा कामावरून घरी परत येईपर्यंत बिच्चार्‍या आईचे डोळे दाराकडे टक लावून मुलगा येण्याची प्रतीक्षा करतात. सातत्याने वाढणारी असुरक्षितता हे यामागचे एक प्रमुख कारण आहे, घरातून बाहेर पडल्यानंतर सहजासहजी कोणताही अपघात न होता घरी परत आलो तर आजचा दिवस सार्थक झाला...असे सूत्रच आता तयार झाले आहे. पूर्वीच्या आईला मुलगा कामावर गेल्यानंतर तितकी काळजी वाटत नव्हती. नोकरीवर जाताना सायकल, बस अथवा रेल्वेने अप-डाऊन करणे इतकीच मर्यादित साधनं होती. पण आजकाल अगदी शाळेतल्या मुलाला सुद्दा बाईक असते, रस्त्यावरून, गल्लीबोळातून भरधाव बाईक हाकताना मुलं दिसतात. नोकरीवरून अथवा शाळेतून मुलं घरी आल्यानंतर पूर्वी मित्र-मैत्रिणीकडे जात होती. आता ही परिस्थिती बदलली असून घरी आल्यानंतर आधी कॉम्प्यूटरवर फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर सारख्या सोशल वेबसाइट्सनां भेट देऊन साइन-इन करून हाय-हॅलो, आपण घरीच आहोत..असे संदेश आउट केले जातात आणि मुलांचा तर तासन् तास फेसबुकवरच गप्पा मारण्यातच वेळ जातो. त्रयस्थ व्यक्तीस फ्रेंडशिप ची रिक्वेस्ट करताना आपल्या घरातच आपल्याशी मित्राप्रमाणे वागणार्‍या आई रुपी फ्रेंडचा विसर मुलांना पडतोय...यामुळे आई आणि मुलांमधला संवादही कुठे ना कुठे हरवला असल्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. परंतु सध्या संवादाअभावी फेसबुक सारखी स्थळंच मित्र असल्याची मुलांमध्ये भावना निर्माण झाली आहे.
आता तर शाळेतही कॉम्प्यूटर (संगणक) हा विषय असल्यामुळे दुसर्‍या इयत्तेतल्या विद्यार्थ्यालाही कॉम्प्यूटर ऑपरेट करता येतो. कॉम्प्यूटर ही आगामी दशकात काळाची गरज ठरणार असल्याचीच ही नांदी म्हणावी लागेल. त्यातच सातत्याने पुस्तकांच्या किंमतीत देखील होणारी वाढ, प्रचंड आणि पालकांना न झेपणारा शैक्षणिक खर्च यामुळे ई-लर्निंग योजना वाढीस लागून घरबसल्याच अभ्यास, शाळा अशा गोष्टी सुरू होतील, तो दिवस दूर नाही! अशा भविष्यामुळे आई देखील संगणक साक्षर होणे आवश्यक आहे. आपली मुलं कॉम्प्यूटरवर बसून काय करतात? कोणत्या वेबसाइट्स उघडतात, त्यातून काय साध्य करतात? याकडे लक्ष ठेवणं ही प्रत्येक आईचीच जबाबदारी ठरणार आहे, नव्हे ठरली आहे. इंटरनेटचा सदुपयोग केल्यास मुलं खरोखर सद् गृहस्थ आणि जीवनात यशस्वी होतील इतकी माहिती इंटरनेटवर असते. सध्या मुलांचे बाबाही दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आणि रात्री उशीरा घरी येत असल्यामुळेच खरंतर आईची जबाबदारी वाढते आहे. आई सुशिक्षित असल्याचा फायदा आईने नक्की करून घ्यावा.
घरातल्या घरातच माणसांऐवजी कॉम्प्यूटरमध्ये हरवत असलेल्या मुलांना यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असून केवळ आईच हे चांगल्या प्रकारे करू शकते. नेट सर्फिंग खूप केली म्हणून न रागावता, स्वतः मुलांकडून संगणक-साक्षर आणि इंटरनेट-प्रवीण होऊन आई सुद्धा मुलांना अभ्यासात मदत करू शकते. मुलं शाळेत, कॉलेजला गेल्यानंतर त्यांना लागणार्‍या नोट्सची माहिती घेऊन ती घरी परत येईपर्यंत त्या नोट्स काढून त्यांना देऊन त्यांचेही टेन्शन हलके झाल्यास कॉम्प्यूटरमध्ये हरविलेली आणि सोशल साईट्समध्ये व्यस्त असलेल्या मुलांना निश्चितच आई हीच आपला खरा फ्रेंड असल्याची जाणीव होऊन हरविलेला संवाद पुन्हा साधला जाईल हाच विश्वास!

शुक्रवार, ६ मे, २०११

बहात्तर वर्षांचे तरूण शिकताहेत "इंटरनेट"...

जिद्द आणि चिकाटी हे दोन गुण अंगी असले तर नशीब सुद्धा बदलतं. अनेकदा जवळ अत्यंत मोजके पैसे घेऊन घराबाहेर पडलेली व्यक्ती तिच्या जिद्दिमुळे आणि चिकाटीमुळे मोठी उद्योगपती, मोठ्या पदावर विराजमान झाल्याची उदाहरणे आहेत. माणसाने मिळेल ते शिकत रहावं, अर्जित करावं त्याने लाभच होतो. याचबरोबर काळाबरोबर चालणारी व्यक्ती सुद्धा प्रगती करू शकते, तिचे कुठेही अडून रहात नाही, हे सिद्ध केलंय युवकांनाही लाजवेल अशा इंदूरच्या अवघे ७२ वय असलेल्या एन. पी. बरगले यांनी...!
भारतीय आयुर्विमा महामंडळातून उच्चपदस्थ पदावरून निवृत्त झाल्यानंतर श्री. बर्गले कधीही स्वस्थ बसलेले नाहीत. दररोज काही ना काही वाचन करणे, फिरायला जाणे ही त्यांची दैनंदिनी आहे. वाचाल तर वाचाल...या उक्तीप्रमाणे दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचून स्वतःला अपडेट करूनच ते घराबाहेर पडतात. ग्लोबलायझेशनच्या काळात इंटरनेटचं महत्व वाढलं असल्याचं आणि हा आलेख उंचावतच राहणार असल्याचं महत्व त्यांना पटलं आहे. आपले चिरंजीव रविंद्र यांच्याकडून ते सध्या दररोज इंटरनेटचे धडे घेत आहेत. रविंद्र हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनुवादक म्हणून सध्या कार्यरत असून इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व आहे. मराठी भाषा सुद्धा त्यांना बर्‍यापैकी समजते. विशेषतः मराठी भाषेतला "ळ" या शब्दाचा उच्चार ते व्यवस्थित करतात. रविंद्र यांचेही जिज्ञासेमुळे सतत वाचन, लेखन सुरूच असते. यासाठी ते आई-वडिलांचे संस्काराचे आउटपुट...या शब्दात आपल्या भावना व्यक्त करतात. आपले वडिल सध्या माहितीचे आगार असलेल्या इंटरनेटची तसंच ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट बद्दल माहिती जाणून घेत असून प्राथमिक माहिती जाणून घेत आहेत.
अनेक शहरांमध्ये अजून इंटरनेटचा वापर करण्यात बर्‍याच प्रमाणत तरूणाई उदासीन दिसते, शासकीय अधिकारी सुद्धा इंटरनेटचा फारसा उपयोग करताना दिसत नाहीत. श्री. एन. पी. बर्गले यांच्यापासून इंटरनेटची माहिती नसलेल्या, वापर न करणार्‍या तरूण मित्रांनी थोडातरी बोध घ्यावा, हीच अपेक्षा.

जेव्हा पुतळे बोलू लागतात...

मध्य प्रदेशातल्या धार येथील फडके स्टुडिओमध्ये तयार करण्यात आलेले हे पुतळे एकमेकांशी बोलत आहेत असा भास न झाल्यास नवलच...

बुधवार, ४ मे, २०११

अजित पवार यांची 6 मे स सह्याद्री वाहिनीवर मुलाखत

मुंबई, ता. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत उद्या (ता. ५ मे) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे. पत्रकार राजू परुळेकर यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षातील प्रगतीचा आढावा घेतानाच भविष्यातील वैभवशाली महाराष्ट्राबाबतचे आपले विचार व्यक्त केले आहेत. राज्याची कृषीप्रगती, शैक्षणिक विकास, अर्थव्यवस्था, सिंचनक्षमता, उर्जास्थिती अशा विविध विषयांवर देखील उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविषयीचे गैरसमज दूरही केले आहेत. मा हिती व जनसंपर्क महासंचालनालयातील निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातील या एक तासाच्या मुलाखतीचे पुनःप्रसारण शुक्रवारी सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत करण्यात येणार आहे.

मुंबई येथे राष्ट्रीय पातळीवर खुली लेख स्पर्धा

मुंबई, ता. ३ - मुंबई येथे संवादिनी संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संवादिनी संस्था प्रामुख्याने ओबीसी वर्गासाठी कार्यरत असून या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जातात. याचा एक भाग म्हणून संस्थेने राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
लेख स्पर्धेचे विषय असे- १. बहुजनांच्या विकासात शासकीय योजनांची भूमिका, २. मी, माझी संस्था आणि बहुजन विकास, ३. आजचा बहुजन समाज आणि राजकारण, ४. आजच्या बहुजन स्त्रियांचे अस्तित्व इ.
उपरोक्त चार विषयांसाठी स्पर्धा असून शब्दमर्यादा १५०० ते २०००० पर्यंत असावी. ही लेख स्पर्धा सर्वांसाठी खुली असून २० मे २०११ पर्यंत अरूण लावंड, सी/२४, सहकार नगर, वडाळा, मुंबई - ३१ येथे पाठवावे. अधिक माहितीसाठी अरूण लावंड ९८६९७४६५१८ किंवा श्रीकृष्ण नाईक ९७५७१७५३९४ येथे संपर्क साधावा.

मंगळवार, ३ मे, २०११

गीतसम्राट हरपला: अजित पवार

मुंबई, ता. ३ - शब्दशृंगारात न्हालेल्या लावणीला मराठी चिरंतन गुंजत ठेवणारा आणि मराठी चित्रपट गीतांना आपल्या शब्दांनी सजवणारा गीतसम्राट हरपला आहे. अशा शब्दात गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोकसंदेशात श्री. पवार म्हणाले, की खेबुडकरांच्या शब्दांनी भक्तांना दत्तगुरुंचं दर्शन घडवं, लहानग्यांना निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्याचं सांगितलं, कोल्हापूरच्या लवंगी मिरचीचा ठसका दाखवला, तर बुगडी सांडल्याची चुगली न करण्याची गळ देखील घातली. पिंजरा, सामना, साधी माणसं या चित्रपटातील त्यांच्या गीतांनी मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला आहे. मराठी चित्रपटगीतांना लोकप्रिय करणार्‍या गीतकारांमध्ये त्यांचे स्थान अत्युच्च होते. त्यांच्या लेखणीतून साकारलेली भक्तीगीते, भावगीते, लोकगीते, चित्रपटगीते मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटगीते पोरकी झाली आहेत.

खेबुडकर यांच्या निधनामुळे श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड - भुजबळ


मुंबई, दि. 3 मे : अनेक वर्षांपासून आपल्या गीतांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांचे मंगळवारी (ता. ३ मे) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर येथील आधार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सोपी, सहजसुंदर शब्दरचना, नादमाधुर्य आणि गेयता ही जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीची प्रमुख वैशिष्टये होती. पी. सावळाराम, शांता शेळके आणि ग.दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने मराठी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग अधिक श्रवणीय बनविण्यामध्ये खेबुडकर यांचा मोलाचा वाटा राहिला. लावणी हा गीतप्रकार सर्वाधिक हाताळणाऱ्या खेबुडकरांनी तितक्याच ताकतीने भक्तिगीते, भावगीते, बालगीते, प्रेमगीते सुध्दा लिहीली. 'पिंजरा'मधील लावण्यांसह त्यांची 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला', 'राजा ललकारी अशी दे', 'ऐरणीच्या देवा', 'देहाची तिजोरी', 'शुभं करोती म्हणा मुलांनो', 'सत्य शिवाहून सुंदर हे'.. अशी एकापेक्षा एक सरस गीते अजरामर बनली आहेत. खेबुडकरांच्या उल्लेखाशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

अंधेरी येथील नूतन 'आरटीओ' इमारतीचा पहिला मजला 15 दिवसांत सुसज्ज करावा - छगन भुजबळ


मुंबई, दि. 2 मे : अंधेरी (पश्चिम) येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कामकाज नूतन इमारतीतून सुरू व्हावे, या दृष्टीने या इमारतीच्या किमान पहिल्या मजल्याचे संपूर्ण काम येत्या 15 दिवसांच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: भेट देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अंधेरी (पश्चिम) येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताब्यातील भूखंडाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाचा श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयातील आपल्या दालनात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रादेशिक परिवहन विभागाची इमारत स्टील्ट अधिक दुमजली असणार आहे. हे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम बाकी असल्याची माहिती श्री. भुजबळ यांना देण्यात आली. त्यावर ते म्हणाले, इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे, जेणे करून प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज नव्या इमारतीत स्थलांतरित करता येऊ शकेल. त्याचबरोबर पाणी व विजेच्या जुन्या जोडण्याही नव्या इमारतीत स्थलांतरित करून द्या. म्हणजे विभागाच्या कामात काही अडचण उद्भवणार नाही. या कामासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळाचाही वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसनासह नाला सरळीकरण व भूखंडातून जाणाऱ्या प्रस्तावित डी.पी. रोडसंदर्भात संबंधित नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभाग तसेच मुंबई महानगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याची सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र सदन, हायमाऊंटचे काम प्रगतीपथावर
या बैठकीत श्री. भुजबळ यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन तसेच हायमाऊंट राज्य अतिथीगृहाच्या कामकाजाच्या प्रगतीविषयीही माहिती घेतली. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या लँडस्केपिंगचे काम सुरू असून ते झाले की अंतर्गत सजावटीचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हायमाऊंट या एकूण नऊ मजल्यांच्या इमारतीच्या पाचव्या स्लॅबचे काम सध्या सुरू असून पहिल्या मजल्याच्या भिंतींच्या बांधकामालाही सुरवात करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सोमवार, २ मे, २०११

नवी मुंबई मेट्रो शहराचा चेहरा बदलणार: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, ता. १ - नवी मुंबईने सर्वांगीण विकासासाठी वेग घेतला आहे. ही निश्चितच आदर्शदायी बाब आहे. देशातील पहिला मेट्रो प्रकल्प स्वतः सिडको महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. विमानतळ व मेट्रो सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच राज्य शासन व सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणारे भविष्यातील विविध प्रकल्प आधुनिक पद्धतीने उभारून नवी मुंबई उपनगराचा 'सुपरसिटी' असा विकास करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. प्रकल्पावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.
श्री. चव्हाण यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या विकासकार्याचे भूमिपूजन रविवारी (ता. १ मे) सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानक (नियोजित) नवी मुंबई येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की नवी मुंबईतील अंतर्गत परिवहनास अधिक व्यापकता व गती देण्याची क्षमता या प्रकल्पात असून, नवी मुंबई प्रकल्पाची उभारणी ही सर्वस्वी सिडको महामंडळाची आहे. या प्रकल्पामुळे नागरीकरणास चालना मिळेल आणि यामुळे आर्थिक प्रगती सुद्धा साधली जाईल. विमानतळापाठोपाठ मेट्रो रेल्वे प्रकल्प व नागरीक सुविधा विकासाला मानवी चेहरा प्रदान करेल.
कार्यक्रमास जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादनशुल्क व अपारंपारिक उर्जामंत्री व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, खासदार डॉ. संजीव नाईक, सिडको संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ११.१० किमी. लांबीच्या बेलापूर ते पेंढर मार्गिका क्र. १ च्या बांधकामास १९८४ कोटी खर्च अपेक्षित असून ११ रेल्वे स्थानके बांधण्यात येतील. हे काम १ मे २०१४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी तर आभार मुख्य अभियंता बिपीनचंद्र मेहता यांनी मानले.

सुट्टीची भटकंती...(८)

घरी परत जायचं मामीला सांगितल्यानंतर मामीन आणखी दोन दिवस राहण्याचा आग्रह केला. खूपच आग्रह झाल्यामुळे मी सुद्धा होकार दिला. आज मामी पापडाचा..बिबडी..हा प्रकार तयार करणार होती. माझ्यासाठी हा प्रकार नवीन होता. पहाटे साडेतीनला काहीतरी खुडबुड ऐकून मला जाग आली. पाहतो, तर मामी स्वयंपाकघरात काहीतरी करत होती....(काही कारणास्तव उर्वरित भाग उद्या...)

नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न


नवी मुंबई नियोजित मेट्रो रेल्वे स्थानकाचेभूमिपूजन आणि प्रकल्पाचा शुभारंभ कुदळ मारून करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण   



ओसामा अखेर संपला..ओसामाचे अलकायदा आता पडणार ओस...

गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानच्या सीमेनजीक वेगात सुरू केलेल्या ओसामा शोध मोहिमेस रविवारी मध्यरात्री (ता. २ मे) अखेर यश मिळाले. अमेरिकेच्या पथकास अपेक्षित यश मिळून ओसामाला ठार मारण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदा या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यामुळे सुमारे तीन हजार लोक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. ओसामाचा म्होरक्या ओसामा लादेन याचे यामागे मास्टरमाईंड असल्याचे मानले जात होते.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, "दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेची लढाई अशीच सुरु राहणार असून, अल कायदाविरुद्धच्या लढाईतील हा सर्वात मोठा विजय आहे. आमची लढाई इस्लामविरुद्ध नसून, दहशतवाद्यांविरुद्ध आहे. या मोहिमेत पाकिस्तानी सैन्याची अमेरिकी सैन्याला मदत झाल्याने मी त्यांचे आभार मानतो."
दरम्यान ओसामा याला ठार मारल्यास अमेरिकेस आणखी गंभीर परिणाम भागावे लागतील अशी माहिती गेल्या आठवड्यात अल कायदा या संघटनेने दिल्याचे वृत्त आहे. ओबामा यांनी लादेनला ठार मारल्याची घोषणा केली तेव्हा व्हाईट हाऊसबाहेर अनेक अमेरिकी नागरिकांची गर्दी जमली होती.
ओसामा ठार झाल्यामुळे आता ओसामाची संघटना अल कायदा ही संघटना नक्कीच ओस पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...