नाशिक (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी लागणार्या जमिनीच्या भूसंपादनात प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, राजकीय आकसापोटी विकासकामांना खीळ बसेल असे प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मुंबई आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा आढावा घेताना पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते.
ते म्हणाले, की प्रत्येकाला विकास हवा आहे. विकास कामांमुळे जमिनीचे भाव वधारतात. शासनाला एक इंचही जमीन विनाकारण नको आहे. शेतकर्यांनी योग्य त्या मोबदल्यात विकासकामांना सहकार्य करावे. विकासाची खरी बाजू जनतेसमोर आणून शासकीय यंत्रणेच्या चुका निदर्शनास आणून देण्याचे आवाहन यावेळी श्री. भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना केले. भूसंपादनापोटी काही ठिकाणी शेतकर्यांना एकरी ६५ लाखापर्यंत भाव देऊनही मोर्चे निघणे ही बाब भूषणावह नाही. आजही कारखानदारांची पहिली पसंती पुण्याकडे आहे कारण तिथे मूलभूत सुविधांचा विस्तार झाला आहे.