मुंबई दि. 23 मार्च : गेली 45 वर्षे समाजकारण, राजकारण, लेखन, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात अखंडपणे कार्य करीत असलेले हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा आहेत, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी बृहद्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांचे काल अभीष्टचिंतन केले.
हेमराज शहा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समितीच्या वतीने येथील बिर्ला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या समारंभात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, प्रसन्न आणि हसतमुख असलेल्या हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. गुजराथी समाजातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समजल्या गेलेल्या अनेक जाती जमातींचा शासनाच्या या बाबतच्या यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. जवळपास 26 पुस्तके लिहून तसेच गुजराथी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्षे स्तंभ लेखन करून आपण एक उत्तम पत्रकार व लेखक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कच्छी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. गुजराथी बांधवांना एकत्र येण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्यमातून गेली 26 वर्षे ते कार्य करीत आहे. निरपेक्ष व नि:स्वार्थ भावनेने अव्याहत कार्य करीत राहिलेला ज्येष्ठ समाजसेवक, अशा शब्दात हेमराज शहा यांचा गौरव करून भुजबळांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात, मुंबईतील मराठी व गुजराथी बांधवांमध्ये बंधुत्वाची भावना वाढविण्यासाठी सातत्याने कार्य करीत असलेल्या हेमराज शहांना राज्याच्या राजकारणात महत्वाचे पद मिळावे यासाठी आमची सर्व ताकद त्यांच्या मागे उभी करू, असे सांगितले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई, मुंबई समाचारच्या संपादक श्रीमती पिंकी दलाल, जन्मभूमिचे संपादक कुंदन व्यास, कवी सुरेश दलाल आदी मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणात हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचा वेध घेतला.
सत्काराला उत्तर देताना हेमराज शहा म्हणाले की, वयाच्या सत्तरीत प्रवेश करताना मला आता कोणत्याच मोठया पदाची अपेक्षा नाही. मी माझे अंगीकृत कार्य यापुढेही निरलसपणे करीत राहणार आहे. महाराष्ट्रात विखुरलेल्या गुजराथी बांधवांचे प्रश्न व समस्या समजून घेण्यासाठी येत्या मे महिन्यात एक मोठे अधिवेशन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आजपर्यंतच्या आपल्या वाटचालीत गुजराथी बांधव, पत्रकार, प्रकाशक, लेखक इत्यादी अनेकांचे खूप सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
या अभीष्टचिंतन सोहळयास विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. श्री. अंकित त्रिवेदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.