मुख्य सामग्रीवर वगळा

राज्यातील सर्व घटकांना सामावून घेणारा, समन्यायी अर्थसंकल्प- छगन भुजबळ

मुंबई, दि. 23 मार्च : राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाला समान न्याय तसेच समाजातील सर्व घटकांना विकासाची समान संधी देणारा असा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन 2011-12 चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात राज्यातील सर्व घटकांच्या विकासाचे सूतोवाच करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत शून्य ते 2 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतानाच कृषी संजीवनी योजनेची घोषणाही स्तुत्य आहे. दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार करून त्या दृष्टीने पाटबंधारे विभागासाठी सुमारे 6300 कोटी तर जवाहर विहीर योजनेसाठी 221 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फलोत्पादन वृध्दी, निर्यात केंद्रे, फार्म पॅक हाऊसिंग या बरोबरच सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र सुजल योजना, रोजगार हमी योजना यांच्यासाठी भरीव तरतूद करून राज्यातील शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय दिला आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन 2012 अखेरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या दिशेनेही अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद समाधानकारक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्याचा रस्ते विकास आणि गडकिल्ले विकासासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचे स्वागत करून श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, रस्तेविकासासाठी 2750 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून 1075 किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी विशेषत: सिंधुदुर्ग, विजयदुर्गसाठी विशेष तरतूद त्याचप्रमाणे सिंहगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड याठिकाणी दृकश्राव्य प्रयोगासह पर्यटकांसाठी विविध सुविधा विकसित करण्यासाठी केलेली तरतूदही राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील मागासवर्गीय तसेच अल्पसंख्य समाजाच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात उपयुक्त अशी तरतूद केली आहे. राज्यातील अनुसूचित जाती- जमातींसाठी तसेच आदिवासी उपयोजनेअंतर्गत वित्तमंत्र्यांनी भरीव तरतूद केली आहे. वित्तमंत्र्यांनी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनाही अत्यंत स्वागतार्ह असल्याचेही श्री. भुजबळ यांनी नमूद केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.