मुंबई, ता. ३ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमतावृद्धीसाठी तसेच विविध नियोजन संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सामायिक बाबी सोडविण्याच्या अनुषंगाने संबंधित संलग्न विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी नुकतीच विभाग प्रमुखांशी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळ्यांवरील प्रलंबित प्रकरणे तसेच या संस्थांच्या कार्यक्षमतेच्या वृद्धीसंदर्भात उपाय योजना किंवा सूचना सादर करण्याच्या अनुषंगाने सिडकोच्या अनुभवी तज्ज्ञजनांमार्फत प्रस्ताव-निवेदन सादर करण्यात यावे, त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होईल असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोला नवी मुंबई शेजारील क्षेत्रासाठी नियुक्त करण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली. महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी मायनर मिनरल ऍक्टमधून सूट मिळावी, विशेष अनुदान मिळावे किंवा कर सवलत मिळावी याबाबत माहितीही त्यांनी दिली. बैठकीस विविध विभाग प्रमुख, जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.