मुंबई दि. 23 मार्च : गेली 45 वर्षे समाजकारण, राजकारण, लेखन, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात अखंडपणे कार्य करीत असलेले हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा आहेत, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी बृहद्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांचे काल अभीष्टचिंतन केले. हेमराज शहा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समितीच्या वतीने येथील बिर्ला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या समारंभात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, प्रसन्न आणि हसतमुख असलेल्या हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. गुजराथी समाजातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समजल्या गेलेल्या अनेक जाती जमातींचा शासनाच्या या बाबतच्या यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. जवळपास 26 पुस्तके लिहून तसेच गुजराथी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्षे स्तंभ लेखन करून आपण एक उत्तम पत्रकार व लेखक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कच्छी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. गुजराथी बांधवांना एकत्र येण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्य...