भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्यात सापडलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज (ता. २२) दुपारी हे वृत्त लिहिपर्यंत दिल्लीकडे रवाना झाले. भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना रविवारीच दिल्ली येथे बोलावले होते, परंतु ते दिल्ली येथे न जाता पुट्टूपूर्ती येथे सत्य साईबाबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व सत्य साई यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी येडियुरप्पा यांनी आपले दोन विश्वासू मंत्री दिल्ली येथे चर्चेसाठी पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त होते. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांना पक्षाने याप्रकरणी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. दरम्यान भूखंड प्रकरण चव्हाट्यावर येताच येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ताब्यातील भूखंड शासनास परत केले होते. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी राजीनामा देऊन पदच्युत व्हावे लागले. हे प्रकरण शमत नाही तोच येडियुरप्पा यांचे प्रकरण समोर आले.