दैनिक सकाळचे मुख्य संपादक, साहित्यिक आणि नियोजित अखील भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे साहित्य आता कन्नड भाषेत देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. श्री. कांबळे यांच्या समृद्ध लेखणीतून तयार झालेल्या प्रत्येक शब्दाने साहित्य आणखी समृद्ध परिपक्व केल्याचे हे द्योतक ठरावे. मराठी भाषेत आणि विशेष म्हणजे लेखणी-साहित्यात किती गोडवा आहे हे यावरून लक्षात येते. श्री. कांबळे यांनी लेखणीत मराठी शब्द असे वळविले की दुसर्या भाषेला सुद्धा मराठीकडे वळावे लागले असून फलश्रृती म्हणजे कन्नड भाषेत देखील त्यांच्या साहित्याचा अनुवाद करण्यात येणार आहे. साहित्यिक सर्जू काटकर यांनी, कांबळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे रूपांतर कन्नडमध्ये केल्यानंतर कन्नड भाषेत सुद्धा अल्पावधीतच हे पुस्तक बहुश्रृत झाले. श्री. कांबळे यांच्यावर आईने मायेने फिरवलेला हात आणि मोरपिसाच्या मंद वार्याची झुळूक आणि शब्दांचा दरवळ या जादूने हे साध्य झाले आहे. इंग्रजाळलेली मराठी बोलणार्या, मराठी असूनही एकमेकांशी इंग्रजी अथवा दुसर्या भाषेत संवाद साधणार्या बांधवांनी यातून बोध जरूर घ्यावा, ही अपेक्षा..!