राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे राज्याच्या कलाक्षेत्राचा गौरव झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, अठ्ठावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचा वरचष्मा आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिमाखदार कामगिरीमुळे मला आनंद झाला आहे. अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वगायन, निर्मिती या क्षेत्रातील मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या दमदार कामगिरीमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणात्मकतेवर राष्ट्रीय मोहोर उमटली आहे.