मुंबई दि. 5 (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्य निवडणूक आयुक्त पदाची पाच वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करुन श्रीमती सत्यनारायण आज निवृत्त होत आहेत. यानिमित्त आज आयोगाच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना एका अनौपचारिक समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव, मधुकर गायकवाड यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. कोणत्याही प्रकारे आपला औपचारिक निरोप समारंभ करु नये अशा प्रकारच्या सूचना श्रीमती सत्यनारायण यांनी आधीच कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांनी निरोप घेतला आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा आगळावेगळा निरोप समारंभ भाषणाविनाच पार पडला.