गेल्या आठवड्यात देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये थंडीने अक्षरशः कहर केला असून जणू काही पृथ्वीच गारठली असल्यासारखे वाटत आहे. मध्य प्रदेशात नुकतेच उज्जेन येथे ५ अंश सेल्सिअस तर इंदूर येथे ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. काही ठिकाणी थंडीमुळे गारठून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक जण अंगावर थंडीपासून बचाव करणारे स्वेटर आदी कपडे चोवीस तास परिधान करीत आहेत. मध्यप्रदेशातील इंदूर येथे एक जानेवारीपासून हेलमेटची सक्ती करण्यात आली असून अद्याप हेलमेट वापरणार्या दुचाकीधारकांची संख्या अल्प असली, तरीही ती वाढत आहे. हेलमेटमुळे चेहेर्याचा थंडीपासून चांगला बचाव होऊन डोळे, कानांना गार हवा लागत नसल्याने हेलमेट विक्रीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे. सकाळी चहा, पोहे, जिलबी, वडे अर्थातच स्नॅक्स घेण्यात नागरिक स्वारस्य देत आहेत. काही भागात संक्रांतीपर्यंत सकाळच्या शाळांची वेळ देखील सकाळी नऊनंतर करण्यात आली आहे.