मुंबई, ता. २१ - प्रा. सुरेश तेंडूलकर यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे. या शब्दात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की प्रा. तेंडूलकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पार्श्वूभूमीवर देशाची विकासविषयक धोरणे ठरविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता.