मुंबई, ता. १२- बारामती येथे नागरी दहशतवाद प्रतिकार पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून २० कोटी रूपये व जमीन उपलब्ध करून दिली जाईल. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पोलिस प्रशिक्षण केंद्रासंदर्भात मंत्रालयात समिती कक्षात ते बोलत होते. गृहमंत्री आर. आर. पाटील, अप्पर मुख्यसचिव उमेशचंद्र सरंगी, पोलिस महासंचालक डी. शिवानंदन उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले की बारामतीजवळ बर्हाणपूर येथील जागा प्रशिक्षण केंद्रासाठी योग्य ठरेल. तेथील पालखी तळ सुरक्षित ठेवून उर्वरित जागेवर प्रशिक्षण केंद्र उभारता येईल. यासाठी केंद्राकडून २० कोटी रुपये मिळणार असून राज्यशासनही २० कोटी रुपये उपलब्ध करून देईल. श्री. शिवानंदन म्हणाले की, राज्यात पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे परंतु नागरी दहशतवाद प्रतिकार प्रशिक्षण केंद्र नाही. केंद्र शासनाने अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. या ठिकाणी पोलिसांना दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्याबाबत अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. अशा प्रशिक्षणाची आपल्या पोलिसांना आवश्यकता आहे.