मुंबई, ता. १ - नवी मुंबईने सर्वांगीण विकासासाठी वेग घेतला आहे. ही निश्चितच आदर्शदायी बाब आहे. देशातील पहिला मेट्रो प्रकल्प स्वतः सिडको महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. विमानतळ व मेट्रो सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच राज्य शासन व सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणारे भविष्यातील विविध प्रकल्प आधुनिक पद्धतीने उभारून नवी मुंबई उपनगराचा 'सुपरसिटी' असा विकास करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. प्रकल्पावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले. श्री. चव्हाण यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या विकासकार्याचे भूमिपूजन रविवारी (ता. १ मे) सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानक (नियोजित) नवी मुंबई येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की नवी मुंबईतील अंतर्गत परिवहनास अधिक व्यापकता व गती देण्याची क्षमता या प्रकल्पात असून, नवी मुंबई प्रकल्पाची उभारणी ही सर्वस्वी सिडको महामंडळाची आहे. या प्रकल्पामुळे नागरीकरणास चालना मिळेल आणि यामुळे आर्थिक प्रगती सुद्ध...