मुख्य सामग्रीवर वगळा

नवी मुंबई मेट्रो शहराचा चेहरा बदलणार: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, ता. १ - नवी मुंबईने सर्वांगीण विकासासाठी वेग घेतला आहे. ही निश्चितच आदर्शदायी बाब आहे. देशातील पहिला मेट्रो प्रकल्प स्वतः सिडको महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. विमानतळ व मेट्रो सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच राज्य शासन व सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणारे भविष्यातील विविध प्रकल्प आधुनिक पद्धतीने उभारून नवी मुंबई उपनगराचा 'सुपरसिटी' असा विकास करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. प्रकल्पावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.
श्री. चव्हाण यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या विकासकार्याचे भूमिपूजन रविवारी (ता. १ मे) सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानक (नियोजित) नवी मुंबई येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की नवी मुंबईतील अंतर्गत परिवहनास अधिक व्यापकता व गती देण्याची क्षमता या प्रकल्पात असून, नवी मुंबई प्रकल्पाची उभारणी ही सर्वस्वी सिडको महामंडळाची आहे. या प्रकल्पामुळे नागरीकरणास चालना मिळेल आणि यामुळे आर्थिक प्रगती सुद्धा साधली जाईल. विमानतळापाठोपाठ मेट्रो रेल्वे प्रकल्प व नागरीक सुविधा विकासाला मानवी चेहरा प्रदान करेल.
कार्यक्रमास जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादनशुल्क व अपारंपारिक उर्जामंत्री व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, खासदार डॉ. संजीव नाईक, सिडको संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ११.१० किमी. लांबीच्या बेलापूर ते पेंढर मार्गिका क्र. १ च्या बांधकामास १९८४ कोटी खर्च अपेक्षित असून ११ रेल्वे स्थानके बांधण्यात येतील. हे काम १ मे २०१४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी तर आभार मुख्य अभियंता बिपीनचंद्र मेहता यांनी मानले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.