मुख्य सामग्रीवर वगळा

'जातिनिहाय जनगणनेला नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे' : भुजबळ

मुंबई 23 : गेली 80 वर्षे प्रलंबित असलेली जातवार जनगणनेची मागणी केंद्र सरकारने मंजूर केली असून त्याचे प्रत्यक्ष काम येत्या एक जूनपासून सुरू होणार असून या कामी समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केले. समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बांद्रा येथील एम.ई.टी.मध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, यापूर्वीची जातिनिहाय जनगणना सन 1931मध्ये झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात यंदा प्रथमच होणाऱ्या जातिनिहाय जनगणनेमुळे जातवार शिक्षण, नोकऱ्या, निवारा, आरोग्य, मूलभूत सोयीसुविधा, आर्थिक, सामाजिक स्थिती यांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्या आधारे पुढील विकास योजना आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाची धोरणे आखली जातील. त्यानुसार राज्यवार व देशाच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी, भटके विमुक्त आणि आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या समाजघटकांना न्याय मिळण्याचे दरवाजे उघडले जातील.
समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनगणनेला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करावे; तसेच, हे काम सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली.
या बैठकीमध्ये जातिनिहाय जनगणनेची मागणी मंजूर करून घेतल्याबद्दल श्री. भुजबळ यांचे अभिनंदन करण्यात आले. लोकसभेत ही मागणी सर्वप्रथम मांडल्याबद्दल खासदार समीर भुजबळ यांनाही धन्यवाद देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या 10 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या मागासवर्गीयांच्या हक्काच्या सनदेच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीला खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, जयंत जाधव, प्रा. हरि नरके, डॉ. कैलास कमोद, माजी आमदार लक्ष्मण तायडे, संदेश कोंडविलकर, वसंत वाणी, डॉ. संजय गव्हाणे यांच्यासह सुमारे 125 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.