मुंबई, दि. 3 मे : अनेक वर्षांपासून आपल्या गीतांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांचे मंगळवारी (ता. ३ मे) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर येथील आधार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सोपी, सहजसुंदर शब्दरचना, नादमाधुर्य आणि गेयता ही जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीची प्रमुख वैशिष्टये होती. पी. सावळाराम, शांता शेळके आणि ग.दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने मराठी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग अधिक श्रवणीय बनविण्यामध्ये खेबुडकर यांचा मोलाचा वाटा राहिला. लावणी हा गीतप्रकार सर्वाधिक हाताळणाऱ्या खेबुडकरांनी तितक्याच ताकतीने भक्तिगीते, भावगीते, बालगीते, प्रेमगीते सुध्दा लिहीली. 'पिंजरा'मधील लावण्यांसह त्यांची 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला', 'राजा ललकारी अशी दे', 'ऐरणीच्या देवा', 'देहाची तिजोरी', 'शुभं करोती म्हणा मुलांनो', 'सत्य शिवाहून सुंदर हे'.. अशी एकापेक्षा एक सरस गीते अजरामर बनली आहेत. खेबुडकरांच्या उल्लेखाशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.