ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांच्या निधनामुळे गंभीर लेखनाबरोबरच विनोदी लेखनावरही प्रभुत्त्व गाजविणार्या आणि नाविन्याचा दृष्टीकोन बाळगणार्या लेखकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अर्थशास्त्रात पारंगत असलेल्या डॉ. भेंडे यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या शैलीतून प्रबोधनाचे कार्य केले. नजरेच्या मिस्किल चष्म्यातून जीवनातील घडामोडींकडे ते खेळकर दृष्टीने बघत. लेखनाच्या माध्यमातून वाचकांनाही ते सहभागी करून घेत. विनोदाच्या पायवाटेवरून चालताना गंभीर आणि समस्याप्रधान कादंबर्यांचेही त्यांनी लेखन केले. त्यांच्या कादंबर्यांमधील आशयात विलक्षण विविधता जाणवते, असा दिलदार आणि अंगभूर रसिकता असलेला लेखक काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी, मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट संवेदनशील साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. सुभाष भेंडे उत्कृष्ट साहित्यिक होतेच परंतु एक उत्तम माणूस देखील होते, या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.