मुंबई, ता. २५ - पर्यटकांना इतर राज्यातील पर्यटन स्थळांचा विसर पडेल इतकी पर्यटन क्षमता कोकणात आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाच्या विकासाकरिता राज्य शासनातर्फे सवर्तोपरी सहाय्य करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त चर्चासत्रात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पर्यटनमंत्री असताना कोकणसाठी केलेल्या प्रयत्नांना तेव्हाच्या मानसिकतेमुळे अनुकूल वातावरण नव्हते, परंतू आजच्या या ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवातून मात्र कोकणवासीयांची पर्यटनाबाबतची मानसिकता अनुकूल झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र किंवा कोकणात येणारा विदेशी पर्यटक सुमारे ८० जणांना रोजगार उपलब्ध करून देतो. कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग व त्यावरील पुलांची बांधकामे प्रगतीपथावर असून लवकरच पूर्णत्वास येत आहेत. रायगड सारख्या ऐतिहासिक किल्ल्याचा व परिसराच्या विकासासाठी खर्च करण्याची राज्य शासनाच...