cidco लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
cidco लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

बंद क्लोज्ड लूप कार्ड परतावा १५ सप्टेंपर्यंत घ्या; सिडको मेट्रो

 नवी मुंबई: सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावरील प्रवाशांकरिता दि. ३ जून २०२६ पासून
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सुरू करण्यात आले असून त्यापूर्वी वापरात असलेली क्लोज्ड लूप
कार्ड बंद करण्यात आली आहेत. 

क्लोज्ड लूप कार्डवरील शिल्लक रकमेचा परतावा दि. १५ सप्टेंबर २०२६ या
अंतिम मुदतीपर्यंत प्राप्त करण्याचे आवाहन सिडकोतर्फे मेट्रो प्रवाशांना करण्यात आले आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ वर यापूर्वी शुल्क भरणा करण्याकरिता क्लोज्ड लूप कार्ड वापरात होते. सदर
क्लोज्ड लूप कार्ड दि. ३ जून २०२६ पासून बंद करण्यात आली असून सदर जुनी क्लोज्ड लूप कार्ड या
मार्गावरील कोणत्याही मेट्रो स्थानकावर प्रवासासाठी वैध राहिलेली नाहीत. ज्या प्रवाशांकडे अद्याप शिल्लक
रक्कम असलेली क्लोज्ड लूप कार्ड आहेत अशा प्रवाशांनी निर्धारित मुदतीत आपल्या कार्डवरील शिल्लक रकमेचा
परतावा प्राप्त करून घ्यावा. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी निर्धारित मुदतीत प्रवाशांनी परताव्याची प्रक्रिया
पूर्ण करावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

सिडकोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवीन गृहनिर्माण योजना; १५ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू: ४,७७९ सदनिका

 सिडको महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ४,७७९ सदनिकांची नवीन गृहनिर्माण
योजना जाहीर करण्यात येत असून, शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता
www.cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे ४,२२९, कळंबोली बस डेपो येथे २५७ आणि खारघर बस डेपो येथे २९३ सदनिका उपलब्ध आहेत.

योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव असून प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत व सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹६ लाखांपर्यंत असलेले व भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत; सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.

तळोजा, कळंबोली व खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे-मेट्रो सुविधा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय
विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत.

सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी-शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन
राहील. अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनी www.cidcohomes.com या संकेतस्थळास भेट द्यावी

सोमवार, २० जुलै, २०२६

सिडको: आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

 सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न
 

सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकाच्या ८,७९५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सिडको भवन, सीबीडी
बेलापूर येथे श्री. अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक; डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक; श्री. सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी; श्री. नरेंद्र भामरे, संचालक (आयटी), एनआयसी; श्रीमती हबीबा ए. एल., उपसंचालक (आयटी), एनआयसी; श्री. श्रीनिवास मोकळीकर, (प्र.) महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना श्री. अश्विन मुद्गल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे लक्ष्य असून, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नामांकित कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आराखडा यांमुळे सिडकोची घरे गुणवत्तापूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.
ही सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. अन्य
प्रवर्गातील सदनिकांची सोडत मा. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे याची
कृपया अर्जदारांनी नोंद घ्यावी.
डिसेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे व खारकोपर
येथे ८,७९५ ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यासाठी १०,८३२ अर्ज प्राप्त झाले
होते. सोडत पूर्णतः पारदर्शक व मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडली असून यशस्वी अर्जदारांची यादी
www.cidcohomes.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

सोमवार, १३ जुलै, २०२६

१३ जुलैपासून बेलापूर–पेंधर मेट्रो प्रवासाचा कालावधी कमी

 १३ जुलै २०२६ पासून बेलापूर–पेंधर मेट्रो प्रवासाचा कालावधी १ मिनिट ३० सेकंदांनी कमी होत आहे.
सोमवार, दिनांक १३ जुलै २०२६ पासून सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ वरील बेलापूर–पेंधर दरम्यानच्या मेट्रो सेवेचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. 

मेट्रो संचालनाचे अधिक कार्यक्षम नियोजन केल्यामुळे प्रत्येक एकेरी प्रवासाचा कालावधी १ मिनिट ३० सेकंदांनी कमी होणार असल्याची कृपया
नागरिकांनी नोंद घ्यावी असे, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी कळवले आहे.


गुरुवार, १८ जून, २०२६

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल

 सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे अश्विन मुद्गल यांनी
१७ जून २०२६ रोजी स्वीकारली. सिडकोचे मुख्य कार्यालय असलेले सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी
मुंबई येथे श्री. अश्विन मुद्गल यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली.

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी ते एमएमआरडीए महामंडळात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते.
सन २००७ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या श्री. अश्विन मुद्गल यांनी
आपल्या प्रशासकीय सेवेची सुरूवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हादंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळयेथे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचेअतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळले आहेत. श्री. अश्विन मुद्गल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत.

“सिडको हे देशातील अग्रगण्य नियोजन व विकास महामंडळांपैकी एक असून, सिडकोतर्फे राबविण्यात
येणाऱ्या वैविध्यपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे.
सध्या सिडकोमार्फत साकारण्यात येत असलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण
पद्धतीने पूर्ण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहील,” असे श्री. मुद्गल यांनी सिडकोच्या उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितले.

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या
सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला. 



यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी
भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे
घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती.
या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक
संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,
श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल
(एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी
२०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या
अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली.



नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था असून नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या भेटी दरम्यान महासंचालनालयातर्फे विमानतळाचे व्यापक
मूल्यमापन करण्यात येऊन विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. नागरी विमान वाहतूक
महासंचालनालयातर्फे विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सीवे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग
सिस्टीम इ. महत्त्वाच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली.


या पाहणी दरम्यान मान्यवरांसाठी मॉक चेक-इन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डमी बोर्डिंग
पास आणि बॅगेज टॅग जारी केले, ज्यावर रीव्ह्यू टीमने समाधान व्यक्त केले.
सिडकोतर्फे ११६० हेक्टरवर विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रती वर्ष २०
दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष टन माल वाहतुकीकरिता नियोजित आहे. अंतिम टप्प्यात विमानतळाची
प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता ९० दशलक्ष आणि माल वाहतूक क्षमता २.६ दशलक्ष टन असणार आहे. मुंबई
येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी भार हलका करण्याच्या उद्देशाने नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात आले आहे. सदर विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील
मध्यवर्ती ठिकाणी असून या विमानतळाद्वारे एमएमआर प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक यांसह प्रस्तावित
हैदराबाद हायस्पीड रेल्वेद्वारे कनेक्टिव्हिटी नियोजित आहे.

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार
२६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे
घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.००
च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या
माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ
शकतात.
सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार
सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू
शकतात.
याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल,
रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड,
४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ अ, सेक्टर-१५, खारघर, पनवेल, रायगड, ४१०२१० येथील अनुभव
केंद्रांवर देखील करण्यात येणार आहे. यामुळे २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या
क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध होणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या ८१० घरांसाठी दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २६ नोव्हेंबर २०१९ रोजी काढण्यात आली. त्यानंतर यशस्वी अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी/निकाल दि. २६ एप्रिल २०२० रोजी www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच कळविण्यात येईल. तसेच गृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०१८ अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील १४,८३८ परवडणाऱ्या घरांची योजना १३ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आली व यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र अर्जदारांना वाटपपत्र देण्यात आले. तथापि, काही अर्जदारांनी घरे सरेंडर/रद्द केली तर काही अर्जदार कागदपत्रे छाननी अंतर्गत अयशस्वी ठरल्याने प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र अर्जदारांची अंतिम यादी/निकाल २६ एप्रिल २०२० रोजी जाहीर करण्यात आली असून सदर यादी अर्जदारांना www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वाटपपत्राची कार्यवाही देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल. ज्या सदनिकाधारकांना ५ वा हफ्ता भरतेवेळी टाळेबंदीमुळे अडचण आली आहे अथवा ते हफ्ता भरू शकले नाहीत, अशा सदनिकाधारकांना यापूर्वीच ३० जून २०२० पर्यंत सदनिकेचा हफ्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या सदनिकाधाराकांना येस बॅंकेच्या समस्येमुळे हफ्ता भरतेवेळी अडचण आली आहे वा ते हफ्ता वेळेत भरू शकले नाही, अशा सदनिकाधारकांच्या विलंब शुल्काबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, नवीन पनवेल (प.), सीबीडी बेलापूर येथील ९ भूखंड (निवासी + वाणिज्यिक वापर) आणि वाशी येथील २ भूखंड (वाणिज्यिक वापर) ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे दि. १८ जानेवारी २०२० रोजी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांपैकी नवीन पनवेल (प.) व खारघर येथील ८ महत्तम बोलीधारकांना भूखंडांचे वापटपत्र कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बोलीधारकांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

सिडको: भूखंड वाटपदारांना अंशतः ऑनलाइन रक्कम भरण्यास मंजुरी- कोरोना लॉकडाउनमुळे निर्णय

सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हप्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत: रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली उद्धृत करणाऱ्या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र (Allotment Letter) पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे तपशील (Installments) व ते भरण्याचा अंतिम दिनांक नमूद केलेले असतात. सध्याच्या प्रक्रियेनुसार संबंधित वाटपदारांनी वाटपपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे हफ्त्यांची रक्कम एक रकमी भरावयाची असते. परंतु सध्याच्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत बॅंकांशी संबंधित समस्या, अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या, संचार करण्यास असलेले निर्बंध इ. बाबींमुळे विहीत मुदतीत हफ्त्याची एकूण रक्कम ऑनलाईन माध्यमातून टप्प्याटप्प्याने अंशतः भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अर्जदारांनी केली होती. वरिल पार्श्वभूमीस अनुसरून संबंधित भूखंड वाटपदारांनी त्यांच्या भरावयाच्या हफ्त्यांची एकूण रक्कम टप्प्याटप्पयाने अंशत: ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामुळे नंतर लागू होणारे विलंब शुल्क हे केवळ उर्वरित रकमेवर लागू होईल व अर्जदारांवर अधिकचा आर्थिक भार पडणार नाही. तरी सर्व संबंधित भूखंड वाटपदारांनी हफ्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशतः ऑनलाइन पद्धतीने विहीत मुदतीनुसार भरावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

मंगळवार, ११ जुलै, २०१७

महिलांचे हक्क व कल्याण समितीचा सिडको महामंडळामध्ये दौरा

नवी मुंबई, ता. ११ - महिलांचे हक्क व कल्याण समितीचा दौरा दिनांक 11 जुलै 2017 रोजी सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महिलांचे हक्क व कल्याण समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत श्रीमती मनिषा चौधरी, विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख, श्रीमती सीमा हिरे, विधानसभा सदस्य श्रीमती दीपिका चव्हाण, विधानसभा सदस्य, श्रीमती विद्या चव्हाण, विधान परिषद सदस्य, ॲड. हुस्नबानू खलिफे, विधान परिषद सदस्य व श्रीमती सायली कांबळे, अवर सचिव आदी उपस्थित होत्या. यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी श्री. विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महिलांचे न्याय्य हक्क व त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची पूर्तता होत असल्याची पडताळणी करून समितीद्वारे त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे खास महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र व प्रकल्पबाधित महिलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या सिडको तारा प्रकल्पाबद्दल या बैठकीत माहिती देण्यात आली.

शुक्रवार, ९ जून, २०१७

सिडकोद्वारा कोपरखैरणे नोडमधील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

मुंबई, ता. 9 - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व 2012 च्या जनहित याचिका क्रमांक 138 नुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनातर्फे कोणताही विकास परवाना न घेता बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयातर्फे देण्यात आले आहेत. सिडकोने व महाराष्ट्र शासनाने या अनाधिकृत बांधकाम विषयी न्यायलयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिवराज एस. पाटील, सिडको व सिडको (उत्तर) अनधिकृत बांधकाम विभाग यांच्यातर्फे दि. 8 जून 2017 रोजी कोपरखैरणे नोड, ठाणे जिल्हा येथील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे नोड सेक्टर-9 मधील बालाजी मल्टीप्लेक्सजवळ असलेल्या अनधिकृत गॅरेज, सर्व्हिस स्टेशन आणि फर्निचरचे दुकान यांच्यावर अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाई करुन 8000 चौ.मी. परिसर अतिक्रमाणापासून मोकळा करण्यात आला.
ही बांधकामे सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असल्याने सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली. ही मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) पी.बी.राजपूत, सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक गणेश झिने यांच्या पथकाने तीव्र विरोधाला सामोरे जाऊन मोहीम सुलभरित्या पार पाडली. कोपरखैरणे पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत के. कांबळे, व 60 पोलिसांच्या पथकाच्या सहाय्याने अतिक्रमणाची कारवाई यशस्वीरीत्या करण्यात आली. तसेच मोहिमेच्या ठिकाणी सिडकोचे पोलिस कर्मचारी, सिडकोचे सुरक्षा अधिकारी श्री.सुरवसे व इतर सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या कारवाईसाठी 2 पोकलेन, 1 ट्रक, 1 जेसीबी, 6 जीप व 27 कामगार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मोहिम सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेने संयुक्तपणे पार पाडली, या कारवाईसाठी प्रभाग अधिकारी अशोक मढवी व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. रिक्त करण्यात आलेल्या भूखंडावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये याकरिता सिडको व सिडको (उत्तर) अनधिकृत बांधकाम विभागातर्फे भूखंड परिसरात कुंपण घातले आहे.

शनिवार, ९ मे, २०१५

अनधिकृत बांधकामांविरूध्द कारवाई होणारच – संजय भाटिया

नवी मुंबई, ता. ८ एप्रिल - नवी मुंबईतील ९५ गावठाणांच्या आसपासची अनधिकृत बांधकामे न्यायालयाच्या निर्णयानुसार पाडणे सिडकोला बंधनकारक असल्याने अशा १६५७ बांधकामाविरूध्दची कारवाई सिडको लवकरात लवकर करील अशी स्पष्ट ग्वाही सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांनी आज दिली. जासई येथील आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री. भाटिया बोलत होते. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे त्यांच्या सततच्या मागणीनुसार नियमित करण्यासाठी समूह विकास योजनेद्वारे गावठाणांचा पुनर्विकास करण्याबाबतची अधिसूचना २०१४ मध्ये शासनाने प्रसिध्द केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या हरकती व सूचनांचा विचार करून शासनाने सुधारित योजना तयार केली. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या बांधकामांना ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ मार्च २०१५ रोजी विधिमंडळात केली होती. सर्व १६५७ अनधिकृत बांधकामे १ जानेवारी २०१३ नंतर बांधण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात अशी १०२१ बांधकामे आहेत तर सिडकोच्या क्षेत्रात ६३६ बांधकामे आहेत. यापैकी ४०१ बांधकामांना १ जून २०१४ नंतर एमआरटीपी कायद्याअंतर्गत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे २४६ बांधकामे आहेत तर सिडको क्षेत्रात १५५ बांधकामे आहेत अशी माहिती भाटिया यांनी दिली. या अनधिकृत बांधकामांचा दर्जा निष्कृष्ट आहे तसेच या बांधकामांनी प्रमाणित नियमांचे उल्लघंन केले आहे. आपत्तीप्रसंगी या बांधकामांपर्यंत पोहोचण्यास योग्य रस्ता नसल्याकारणाने अग्निशमन आणि सुरक्षा नियमांचाही भंग या बांधकामांमुळे झाला आहे. बहुतांशी बांधकामे सामाजिक सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांवर पेट्रोलियम आणि ओएनजीसी पाईपलाईन्सवर करण्यात आली आहेत. गावठाणापासूनच्या २०० मी. क्षेत्राबाहेरील परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सिडकोने प्राधान्य दिले आहे. सिडकोने खारघर येथील फारशीपाडा येथील बेकायदेशीर इमारती पूर्णत: जमीनदोस्त केल्या. १५ मे पर्यंत १८८ जागांवरील अनधिकृत बांधकामांविरूध्द कारवाई करण्याची मोहीम सिडकोने हाती घेतली आहे. कामोठे येथील एका अनधिकृत बांधकामाविरूध्द ३० एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामाविरोधी मोहिमेसाठी विशेष बंदोबस्त देण्याच नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी मान्य केले आहे. जी बांधकामे पाडता येणे शक्य नाही त्यांच्याविरूध्द गुन्हे नोंदविण्यात येतील. अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देण्यात येऊ नये तसेच पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याची व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधा पुरवू नयेत अशी विनंती करणारे पत्र सिडकोने पाठविले आहे. मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागालाही या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेल्या २०१२ पर्यंतच्या बांधकामांना शासनाने अभय दिले आहे. मात्र त्यानंतर केलेल्या बांधकामांबाबत कोणतेही खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत अशा इशाराही भाटिया यांनी दिला आहे. गावठाणांबाहेरच्या बांधकामांचा व्यवहार करताना सिडकोकडे अवश्य चौकशी करावी. तसेच या बांधकामांसंदर्भात देण्यात येणाऱ्या भुलथापांना बळी पडू नये. अनधिकृत बांधकामे किती निष्कृष्ट दर्जाची असतात हे जिल्ह्यात काही ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमुळे सर्वांच्याच निदर्शनास आले आहे अशी आठवणही त्यांनी करून दिली. अनधिकृत बांधकामांचे खरेदी-विक्री व्यवहार बेकायदेशीर तर आहेतच शिवाय त्यामुळे स्वत:च्या जीवावर संकट येऊ शकते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकामांविरूध्द उचललेले पाऊल सिडकोने आजवर कधीही मागे घेतलेले नाही. सिडकोने नेहमीच प्रकल्पग्रस्तांच्या भल्याचा विचार केला आहे. गावठाणातील अविकसित आणि अनियोजनबध्द विकासामुळे प्रकल्पग्रस्तांना एका जागतिक दर्जाच्या शहरात राहूनही अनेक पायाभूत सुविधांना मुकावे लागत आहे. गावठाण परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान सुधारण्यासाठीच सिडकोने समूह विकास योजना आणली आहे. या योजनेत समूहाचे म्हणजेच सर्वांचे हित साधले जाईल. यात कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही याकडेही भाटिया यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले.

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०१४

नवी मुंबईने पाडला स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीचा नवा पायंडा

नवी मुंबई, (प्रतिनिधी) - सीसीटीव्ही देखरेखीसाठी स्वेच्छेने आचारसंहिता राबविणारे नवी मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीची आचारसंहिता तयार केली. सिडको अधिकारकक्षेतील खाजगी तसेच सरकारी आस्थापनांनी या आचारसंहितेला मान्यता दिली आहे. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सिडकोने सुकाणू समिती स्थापन केली होती. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्राइसवॉटरहाऊसकूपर्स हे सिडकोचे या प्रकल्पासाठी सल्लागार आहेत. समितीने नवी मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी संघटना, संस्था आणि कंपन्यांच्या वरिष्ठांशी या संहितेबाबत चर्चा करून ती निश्चित केली. या संहितेनुसार रेल्वे स्थानके, दुकाने, मॉल्स, चित्रपटगृह, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण प्रकल्प, कारखाने, गोदामे अशा विविध सार्वजनिक स्थळी छुपे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही आचार संहिता नवी मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन आणि सिडको यांच्या वेबसाईटवर पहावयास मिळेल. लवकरच नवी मुंबईतील सिडकोच्या अधिकारक्षेत्रात सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. या कॅमेऱ्यांचे चित्रिकरण नवी मुंबई पोलीस मुख्यालयात उपलब्ध राहील.

शनिवार, २८ जून, २०१४

पारगाव ग्रामस्थांनी दिले नवी मुंबई विमानतळ भूखंडासाठी संमतीपत्र

मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने जाहीर केलेले आणि राज्य शासनाने मंजूरी दिलेले नुकसान भरपाई, पुनर्वसन आणि पुन:स्थापना पॅकेज मान्य असून यासंदर्भातील गावांचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात आणि आपल्या जमिनी सिडकोकडे हस्तांतर करण्यास सहमत असल्याचे पत्र पारगाव ग्रामस्थांनी सिडको व्यवस्थापनाकडे सादर केले. दिनांक 26 जून 2014 रोजी पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपले सहमतीपत्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांचेकडे सुपूर्द केले. या शिष्टमंडळात सरपंच श्रीमती बेबी वाघ, उपसरपंच श्री. संतोष म्हात्रे, सदस्य श्री. विकास पाटील, प्रफुल्ल मेहर, प्रल्हाद नाईक, जागृती कारेकर, वंदना पाटील यांचेसमवेत डॉ. प्रकाश पाटील, बाबूराव पाटील, सदाशिवराव पाटील, भास्कर पाटील, रत्नदीप पाटील, विजय पाटील, सुहास पाटील, सुरेश म्हात्रे, मोहनराव नाईक यांचा समावेश होता.

गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी रोजी

विशेष प्रतिनिधी- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी निघणार अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिनांक 29 जानेवारी 2014 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सिडकोच्या निर्मल मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको व श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने विमानतळातकरिता संपादित करावयाच्या जमीनीच्या मोबदल्यात सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यात भूधारकांना 22.5% जमीन मिळणार आहे. त्याचबरोबर पुनर्वसन आणि पुन:स्थापन संदर्भातीलही सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. यास बहुतांश प्रकल्पबाधित सहमत आहेत. काही गावांचा या पॅकेजला विरोध असून त्यांनाही या पॅकेजसंदर्भातील सविस्तर माहिती अवगत करून दिल्यास त्यांची सहमती मिळविणे शक्य होईल असेही श्री. हिंदुराव यांनी यावेळी सांगितले. अर्हता विनंती निविदेच्या दस्ताऐवजास केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून आता या संदर्भातील निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी जागतिक निविदेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेस 90 दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून त्यानुसार प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र संस्थांची यादी जाहीर करण्यात येईल. तद्नंतर स्वारस्य अभिव्यक्ती निविदा मागविण्यात येतील. या प्रक्रियेअंती नवी मुंबई विमानतळाच्या विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागीदार निवडला जाईल. ज्यांच्यामार्फत विमानतळ विकासाचे कार्य सुरू करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेस 9-10 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. सार्वजनिक खाजगी भागीदाराच्या निवडीनंतर लवकरच विकास कामास सुरूवात करण्यात येईल. विमानतळाकरिता आवश्यक जमीनीच्या भूसंपादनसंदर्भातील कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व भूधारकांची सहमती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही श्री. हिंदुराव यांनी सांगितले. मूळ विमानतळ प्रकल्पाकरिता 1160 हेक्टर जमीनीची आवश्यकता असून त्यापैकी 292 हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. विमानतळ आणि संलग्न विकास क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ 2268 हेक्टर असून त्यापैकी 75 टक्के जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. उर्वरीत 25 टक्के जमीनीचे भूसंपादन अद्याप बाकी आहे. या जमीनीचे संपादन भूधारकांच्या सहमतीनेच करण्यात येणार आहे. विमानतळ क्षेत्रातील जमीन विकासासंदर्भातील 50 टक्के कामे प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना देण्यात येणार असून सद्यस्थितीत पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या पुष्पक नगरीतील जमीन विकासासाठी 300 कोटी रूपये किंमतीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विमानतळाकरिता संपादित केलेल्या जमीनीच्या बदल्यात पुष्पक नगर येथे 22.5 टक्के जमीन देण्यात येणार आहे. राहत्या घरांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापनेसाठी वडघर आणि वहाळ येथील क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे अशीही माहिती श्री. हिंदुराव यांनी दिली.

बुधवार, १५ जानेवारी, २०१४

सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प या नव्या गृहसंकुलाच्या योजनापुस्तिकेची विक्री 16 जानेवारीपासून सुरु

नवी मुंबई (खारघर)दि. १५ - महाराष्ट्रातील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारे सिडको पुन्हा एकदा व्हॅलीशिल्प हा भव्य गृहप्रकल्प घेऊन येत आहे. नवी मुंबई, खारघर, सेक्टर 36 मध्ये साकारलेला हा गृहप्रकल्प 16 जानेवारी 2014 पासून लोकांसाठी खुला होत आहे. या प्रकल्पासाठीचे अर्ज 16 जानेवारी ते 5 फेबुवारी 2014 या काळात सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत तर शनिवारी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्ध होतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे अर्ज उपलब्ध होणार नाहीत. व्हॅलीशिल्पच्या अर्जाची किंमत रुपये 500/- (+ रु. 25/- वॅट) एवढी असेल. हे अर्ज, तळ मजला, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, तिसरा मजला, पणन विभाग-2, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, अकरावा मजला, निर्मल, नरिमन पाँईट, मुंबई, टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा या ठिकाणी उपलब्ध होतील. अर्जदारांनी नोंदणी शुल्काच्या रकमेचा सिडको लिमिटेडच्या नावे काढलेला व नवी मुंबई येथे देय असलेल्या डीडी अथवा पे ऑर्डर सहीत अर्ज 20 फेबुवारी 2014 पर्यंत टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत सादर करावा. कुरीअर अथवा पोस्टाने पाठवलेले अर्ज गाह्य धरले जाणार नाही. या गृहसंकुलासाठी सिडकोने पात्रतेचे काही निकष ठेवले आहेत. अर्जदाराचे कौटुंबिक मासिक उत्पन्न 62,000/- रुपये पर्यंत असेल तर त्यांना मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सदनिकेसाठी अर्ज करता येईल. उच्च उत्पन्न गटासाठी मासिक उत्पन्नाची मर्यादा नाही. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कमीतकमी 15 वर्षांचा रहिवासी असावा, तसेच अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणाचेही नवी मुंबईत घर नसावे. शासनाच्या आरक्षण धोरणानुसार या गृहसंकुलात विविध प्रवर्गांसाठी काही सदनिका राखीव असतील. त्याचबरोबर सिडको यावेळी प्रथमच विशेष प्रवर्गांसाठी राखीव कोट्यातील काही सदनिका उपलब्ध करुन देणार आहेत. त्यात महाराष्ट्र विधानसभा/परिषदचे विद्यमान सदस्य, नवी मुंबईतले पत्रकार तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त यांचा समावेश आहे. व्हॅलीशिल्प हे 6.45 हेक्टरच्या विस्तीर्ण भूखंडावर साकारण्यात आलेलं निसर्गाच्या सान्निध्यातलं आणि आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त असं भव्य गृहसंकुल आहे. यात मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी मिळून एकूण 1224 सदनिका आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी 802 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचे बांधीव क्षेत्रफळ 1015.42 + 55.58 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) तर चटई क्षेत्रफळ 609 + 45.19 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) एवढं आहे. या सदनिकेची किंमत 49 ते 60 लाख रुपये एवढी आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 422 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचे बांधीव क्षेत्रफळ 1515.76 + 58.96 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) तर चटई क्षेत्रफळ 1024.56 + 58.18 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) एवढं आहे. या सदनिकेची किंमत 96 लाख ते 1.07 कोटी रुपये एवढी आहे. व्हॅलीशिल्पमध्ये उत्तमोत्तम आणि आधुनिक सुविधा देण्याचा सिडकोने पूरेपूर प्रयत्न केला आहे. यात दोन उद्वाहकांसहित वातानुकुलित क्लब हाऊस, सर्व आधुनिक सोयींनीयुक्त फिटनेस सेंटर (टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॉश कोर्ट, टेबल टेनिस, स्नूकर, चेस, कॅरम इ.), जॉगिंग ट्रॅक, स्नेहसंमेलनांसाठी आणि कार्यकमांसाठी सभागृह, लहान मुलांसाठी खेळांसह बगीचे, मैदाने, पाळणाघर, लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी जलतरण तलाव, बहुस्तरीय वाहनतळ आदी सुविधा आहेत. घराच्या अंतर्गत सुविधांबाबतीत सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. घराचा मुख्य दरवाजा अग्नी रोधक असून फेम्स आणि फिटिंग्सने परिपूर्ण आहे तर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. उत्तम प्रकल्प स्थळामुळे हे गृहसंकुल नवी मुंबईत लोकप्रिय होईल याची आम्हाला खात्री वाटते. हा गृहप्रकल्प प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो स्थानकापासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला सोयीच्या वाहतुकीने जोडलेला आहे. प्रसिध्द सेन्ट्रल पार्क आणि गोल्फ कोर्स केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर तर खारघर रेल्वे स्थानक 7 किमी अंतरावर आहे. रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बस स्थानक आदी सर्व सुविधा संकुलाच्या अगदी जवळ आहेत तर पांडवकडा धबधबा हे प्रसिध्द पर्यटनस्थळ केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. नवी मुंबई मध्ये स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांचे स्वप्न व्हॅलीशिल्पच्या माध्यमातून साकार होईल याची सिडकोला खात्री आहे. ज्यांना या प्रकल्पाचा एक भाग होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रकल्पस्थळी सॅम्पल फ्लॅट अवलोकनार्थ उपलब्ध आहे. सिडकोने या पूर्वीही उन्नती, वास्तुविहार, सेलिबेशन्स, स्पॅगेटी तसेच सीवूडस इस्टेटच्या माध्यमातून अनेकांना आपले घराचं स्वप्न साकार करण्याची संधी दिली आहे आणि सिडको कायमच या कामाप्रती बांधील राहील.

शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

Makar Sankranti Mela at CIDCO Urban Haat - Belapur

BELAPUR - Makar Sankranti a major harvest festival celebrated in India is here. It is known and celebrated by different customs in different parts of the country. The festival in southern parts of India is celebrated as Pongal whereas in Punjab as Maghi. Since Makar Sankranti is celebrated for innumerable reasons and in innumerable ways CIDCO Urban Haat also gives you a reason to celebrate this auspicious festival from 3rd to 19th January, 2014 at CIDCO Urban Haat near CBD Belapur Railway Station. In this grand Sankrant Mela, artisans from West Bengal, Maharashtra, Assam, Tripura, Rajasthan, U.P, Tamil Nadu, Gujarat, Punjab, Jammu & Kashmir and Bihar are participating with exclusive handloom and Handicraft products. In handicrafts terracotta, leather products, jute products, bamboo products, wall hangings, artificial jewellery, stone arts, paintings, bangles, carpets, statues will be exhibited by master craftsmen from various states of Maharashtra. Apart from handloom and handicraft articles, Urban Haat this time has come up with an exclusive food court for the food lovers. There will be a special display of Konkan food products from Sindhudurg, Kolhapur, Raigarh and Ratnagiri by the Self Help Groups, wherein one can enjoy delicious Kolhapuri, Malvani and Sea food items all under one roof. Makar Sankrant Mela will start with a huge ovation this New Year at Urban Haat. CIDCO has proposed many events like Gandhi Shilp Bazaar, National Handloom Expo, Vasant Mela, Chaitra Mela and Summer Festival at the Haat till June 2014. The calendar of event for the same is ready. Many cultural programmes are held in the amphitheatre in the weekends. Some of the programmes scheduled are fashion designing shows, Film Festivals, Dance, Drama, Orchestra and many other cultural activities by schools and colleges of Navi Mumbai. So, don’t forget to participate in the upcoming cultural programs organized at the Haat. If any colleges, schools, NGO's, cultural organizations are interested for organizing cultural activities in the amphitheatre of CIDCO Urban Haat they can contact Manager CIDCO Urban Haat for booking and further details. Urban Haat now days, is becoming ever permanent Haat for genuine rural Indian craftsmen to display their special handloom & handicraft products directly to the citizens of Navi Mumbai.

शनिवार, १ जून, २०१३

सिडको संचालक मंडळाची बैठक उत्साहात: वाळूज, द्रोणागिरी, नेरुळ विविध पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता

मुंबई, ता. 31 मे- सिडको संचालक मंडळाची विविध योजने अंतर्गत पायाभूत सुविधा अंदाजपत्रकीय बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध योजनांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली. नवी मुंबईतील 12.5 टक्के योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता, प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यावेतनात वाढ आणि समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास मंजुरी असे महत्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतले. बैठकीस श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (नगर विकास-1) श्री. यु.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको, श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. सर्व विषयासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित उपकमांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या सिडकोच्या समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास संचालक मंडळाने मंजूरी दिली. या धोरणानुसार 5 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान देण्यासाठी संचालक मंडळाने मंजूरी दिली. त्याचप्रमाणे भाडेपट्टयने वितरित करण्यात आलेल्या भूखंडांवरील बांधकामांकरिता नवी मुंबई जमिन विल्हेवाट अधिनियमानुसार कालावधी देण्यात येतो त्यात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली असून शासनाच्या आदेशानंतर या संदर्भात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. द्रोणागिरी सेक्टर-50 व 51 मध्ये 12.5 टक्केयोजनेअंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 17.84 कोटी रुपये खर्चाच्या कामासाठी यावेळी मंजूरी देण्यात आली. 12.5 टक्के योजनेअंतर्गत द्रोणागिरी येथील सेक्टर-52 ते 55 येथे एकात्मिक भौतिक सुविधांच्या विकासासाठी रु. 36.23 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच द्रोणागिरी येथील सेक्टर-15 मधील रस्त्याचा विकास, पावसाळी पाण्याची गटारे, पाणी पुरवठा वाहिन्या व उर्वरित मलनि:सारण वाहिन्यांच्या विकासासाठी रु. 13.35 कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली. वाळूज महानगर प्रकल्पाच्या भविष्यातील विकासाकरिता तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यता अभ्यासासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. नेरुळ-बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे प्रकल्पातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता अंदाजित अर्थसंकल्पानुसार रु. 739.46 लाख खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंबंधातील निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. याचबरोबर नवी मुंबईतील प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरती परिक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याच्या योजनेसही या बैठकीत मंजूरी देण्यात आली. वाळूज महानगर प्रकल्पातील नगर-1, 2 व 4 मधील पायाभूत सुविधांसंदर्भातील उर्वरित विकासाकरिता रु. 667 कोटी खर्चासही या बैठकीत मंजूरी देण्यात आली. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

शुक्रवार, १ मार्च, २०१३

नवी मुंबई मेट्रो – आता वाटचाल 21 व्या शतकाच्याही पुढे

स्वयंपूर्ण नवी मुंबईतील भविष्याची गती सांभाळणारा तर्कसंगत आणि सुयोग्य प्रकल्प म्हणजे नवी मुंबई मेट्रो. परिवहनाच्या बृहद आराखड्यावर आधारीत बहुपर्यायी दळणवळण व्यवस्थांना पूर्णत्व देणे हाच मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा उद्देश.

दिल्ली मेट्रो रेल्वे कॅार्पोरेशन आणि ली असोसिएट्‌स साऊथ एशिया यांच्या सूचनाबरहूकुम नवी मुंबईत पाच मार्गांचे जाळे विणले जाणार आहे. पूर्णत: उन्नत मार्गिकेवरून धावणारी ही मेट्रो पहिल्या टप्प्यात 11 कि.मी. अंतराच्या बेलापूर ते पेंधर क्षेत्रातील परिवहनाला नवे परिमाण देईल यात शंका नाही.
रेल्वेने निर्धारित केलेल्या बांधकाम दर्जाच्या परिमाणांची काटेकोर पूर्णता जागे अभावी, जागेच्या पूर्व-नियोजित वापरामुळे अथवा आरक्षणामुळे होऊ न शकल्याने नवी मुंबईतील काही नोडस्‌ रेल्वे मार्गापासून वंचित राहिले. जनतेला सर्व सुविधा पुरविण्याचा वसा घेतलेल्या, नागरिकांच्या समस्यांची, मागण्यांची प्राथम्याने दखल घेणाऱ्या सिडको प्रशासनानं त्यावर काढलेला तोडगा म्हणजे नवी मुंबई मेट्रो.

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या शक्यतेबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून प्राप्त होताच सिडकोने व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पास गती देण्यास प्रारंभ केला. सिडकोच्या बांधकाम दर्जास साजेसा आणि प्रकल्प परंपरेत बसेल असा हा प्रकल्प व्हावा, नागरिकांच्या गरजांची पूर्तता योग्यरित्या व्हावी म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा सिडको अधिकाऱ्यांनी अभ्यास केला.

प्रकल्पाच्या जडणघडणीचे टप्पे निश्चित करणे, कालावधी ठरविणे, दर्जाची सुनिश्चिती करणे आणि संभाव्य खर्चाचा अंदाज घेणे, ह्यासाठी सिडकोने या क्षेत्रातील अग्रगण्य अशा लुईस बर्गर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीची विशेष सल्लागार म्हणून पारदर्शक आणि स्पर्धात्मक लिलाव पद्धतीने नेमणूक केली. दरम्यान प्रकल्पाच्या देखरेखीसाठी सिडकोच्या तांत्रिक गटाची नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनानं 10 सप्टेंबर 2010 रोजी, भारतीय ट्रॅम कायदा, 1886 अन्वये नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासन आणि अंमलबजावणीसाठी सिडकोला अधिकार दिले. मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा पायाभरणी समारंभ 1 मे 2011 रोजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचे आवाहन सिडकोला केले. प्रकल्पाचा नियोजित कालावधी पाच वर्षांचा असला तरी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा श्री. सत्रे यांनी निर्धार व्यक्त केला असून त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली आहे.

ज्या दोन स्तंभांवर मेट्रो मार्गाचा व्हायडक्ट आधारलेला असतो ते पायर्स उभारणे हा या प्रकल्पाचा सर्वाधिक महत्वाचा टप्पा आहे. मेट्रोचा संपूर्ण डोलाराच यावर आधारलेला असल्याने त्याचा पाया भक्कम असणं क्रमप्राप्त आहे. म्हणून यास अधिक काळ लागतो. शिवाय या कामाचे सर्व सामान रस्त्यावर पसरलेले असल्याने त्यास जागाही खुप लागते आणि रहदारीची गैरसोयही होते. म्हणून या कामी दोन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजवर या दोन्ही कंपन्यांनी 86 पायर्स उभारले आहेत. व्हायाडक्ट सोबतच स्थानकांची बांधणी, मेट्रो रेल्वेच्या कामांची यंत्र-सामुग्री ठेवण्यासाठी आगारांचा विकास तसेच विद्युत व्यवस्था, सिग्नल यंत्रणा यांची कामेही विविध टप्प्यांवर सुरु आहेत.

दरम्यान नवी मुंबईच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता सिडकोने काही महत्वाचे बदल या प्रकल्पात केले आहेत. डब्यांची रुंदी 2.9 मिटरवरून 3.2 मिटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने याला मान्यता दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालात सुचविलेल्या 75 व्होल्ट एकदिश विद्युत प्रवाहाऐवजी (DC) कमी संख्येच्या ट्रॅक्शन सबस्टेशनचा, कमी जागा लागणारा 25,000 व्होल्ट एकांतरीत विद्युत प्रवाहाचा (AC) वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रकल्पाच्या दूरसंपर्क प्रणालिसाठी ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रॅक सर्किट (ए.एफ.टी.वी.) आणि सिग्नल यंत्रणेसाठी रंगीत प्रकाश प्रणाली निश्चित करण्यात आली होती, यात सुधारणा करून दूरसंपर्कावर आधारित सर्वोत्कृष्ट रेल्वे नियंत्रण प्रणाली (सीबीटीसी) हा पर्याय निवडण्यात आला आहे. एएफटीसी प्रणालित तांब्याचा वापर असल्याने हवामानातील काही घटकांचा त्यावर विपरित परिणाम संभवतो ज्यामुळे यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे तांब्याच्या चोरींची शक्यताही असते. म्हणून हा बदल अत्यंत मूलगामी स्वरुपाचा आहे.

सीबीटीसी यंत्रणेत माहिती प्रक्षेपण अधिक खात्रीलायक होते. तसेच यात केंद्रीय नियंत्रण कक्षाकडून होणारे संदेशवहन दोन्ही बाजुंनी शक्य होते. रेल्वे गाडीचे अचूक स्थलनिर्देशन शक्य होते. तसेच उर्जा संवर्धनही होते. परिणामी धावपट्टीवरील दोन गाड्यांमधील अंतर 90 सेकंदापर्यंत कमी करून प्रणालीची क्षमता 65,000 पीएचपीडीटी इतकी वाढते. मेट्रोच्या सर्व स्थानकांवर स्वयंचलित प्रवासशुल्क यंत्रणा स्थापन्यात येणार आहे. या संगणकीकृत यंत्रणेत स्वयंचलित प्रवेशद्वार असतील. तिकिटांएवजी स्मार्ट टोकन्स आणि स्मार्ट कार्डसचा वापर करण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पात दर्जा तसेच सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून मेट्रो प्रणालीच्या अंतिम निविदा प्रक्रियेत यासाठी स्वतंत्र गुणवत्ता लेखापरीक्षक आणि स्वतंत्र सुरक्षा निर्धारक यांची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे व दोघेही महामंडळाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास कटीबद्ध असतील.
प्रकल्पाविषयीच्या अपेक्षा वाढल्यामुळे भागधारकांना प्रकल्पाच्या विविध गतिविधीविषयी आवश्यक आणि योग्य माहिती देणे अत्यावश्यक झाले होते व ते परिणामकारकरित्या साधता यावे म्हणून मेट्रो प्रकल्पास वाहिलेले एक स्वतंत्र संकेतस्थळ निर्मिण्यात आले. www.navimumbaimetrorail.com या संकेतस्थळावर सामान्य जनतेला या प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल. निविदा प्रक्रियेत वास्तुरचना क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आलेला सहभाग व परिपूर्ण तयारी यामुळेच हे साध्य करण्यात यश आले आहे.

मेट्रो प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी एकूण 6 वेगवेगळे पर्याय असलेल्या सर्वकष प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला व प्रत्येक पर्यायाचे फायदे–तोटे लक्षात घेऊन सिडको महामंडळाचा भागभांडवळात 26% सहभाग असलेला पर्याय अंतिम करण्यात आला. याचा प्रारंभीचा कार्यकाल 10 वर्षाचा असून त्याचा खर्च रू. 550 करोड इतका आहे. चालक संस्थेची निवड करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.

महामंडळाच्या धोरणानुसार प्रकल्पाच्या आरंभापासून दर पंधरवड्यानी या प्रकल्पाचा आढावा अतिशय बारकाईने घेतला जातो त्यावर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक स्वत: जातीने लक्ष ठेवून असतात तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते आजपर्यंत प्रकल्पपुर्तीच्या एकूण कारभाराचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या कमीत कमी 60 बैठका तसेच प्रकल्प स्थळाला विविध राज्यस्तरीय मान्यवरांकडून दिल्या जाणाऱ्या नियमित भेटीच्या आधारे प्रकल्पाचा मध्यावधी आढावा घेण्याची आवश्यकता नाही, असे जर म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
(शब्दांकन- डॉ. मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको)

शनिवार, २१ जुलै, २०१२

मृणाल गोरे यांना सिडको तर्फे श्रद्धांजली

मुंबई, ता. २० - राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मृणालताई गोरे यांनी आपल्या सामाजिक लढ्याचा प्रवास सुरू केला तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन लढत होत्या. त्यांच्या निधनाने राज्याने एक तेजस्वी, झुंजार नेतृत्व गमावले आहे. या शब्दात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी श्रीमती मृणालताई गोरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली.
ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास संघर्षमय जीवनाचे एक प्रतीकच बनला आहे, असे मत श्री. हिंदूराव यांनी व्यक्त केले.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...