सिडको संचालक मंडळाची बैठक उत्साहात: वाळूज, द्रोणागिरी, नेरुळ विविध पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता
मुंबई, ता. 31 मे- सिडको संचालक मंडळाची विविध योजने अंतर्गत पायाभूत सुविधा अंदाजपत्रकीय बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध योजनांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली.
नवी मुंबईतील 12.5 टक्के योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता, प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यावेतनात वाढ आणि समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास मंजुरी असे महत्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतले.
बैठकीस श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (नगर विकास-1) श्री. यु.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको, श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. सर्व विषयासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित उपकमांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या सिडकोच्या समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास संचालक मंडळाने मंजूरी दिली. या धोरणानुसार 5 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान देण्यासाठी संचालक मंडळाने मंजूरी दिली. त्याचप्रमाणे भाडेपट्टयने वितरित करण्यात आलेल्या भूखंडांवरील बांधकामांकरिता नवी मुंबई जमिन विल्हेवाट अधिनियमानुसार कालावधी देण्यात येतो त्यात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली असून शासनाच्या आदेशानंतर या संदर्भात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
द्रोणागिरी सेक्टर-50 व 51 मध्ये 12.5 टक्केयोजनेअंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 17.84 कोटी रुपये खर्चाच्या कामासाठी यावेळी मंजूरी देण्यात आली. 12.5 टक्के योजनेअंतर्गत द्रोणागिरी येथील सेक्टर-52 ते 55 येथे एकात्मिक भौतिक सुविधांच्या विकासासाठी रु. 36.23 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच द्रोणागिरी येथील सेक्टर-15 मधील रस्त्याचा विकास, पावसाळी पाण्याची गटारे, पाणी पुरवठा वाहिन्या व उर्वरित मलनि:सारण वाहिन्यांच्या विकासासाठी रु. 13.35 कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली.
वाळूज महानगर प्रकल्पाच्या भविष्यातील विकासाकरिता तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यता अभ्यासासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
नेरुळ-बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे प्रकल्पातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता अंदाजित अर्थसंकल्पानुसार रु. 739.46 लाख खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंबंधातील निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. याचबरोबर नवी मुंबईतील प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरती परिक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याच्या योजनेसही या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
वाळूज महानगर प्रकल्पातील नगर-1, 2 व 4 मधील पायाभूत सुविधांसंदर्भातील उर्वरित विकासाकरिता रु. 667 कोटी खर्चासही या बैठकीत मंजूरी देण्यात आली. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.