
ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास संघर्षमय जीवनाचे एक प्रतीकच बनला आहे, असे मत श्री. हिंदूराव यांनी व्यक्त केले.