सिंधुताई सपकाळ यांनी श्रोत्यांना हासू व आसू यांच्या हिंदोळ्यावर सर्वांना खिळवून ठेवत, स्त्री हीच सर्वांना सावरणारा स्तंभ असतो हे स्पष्ट करून स्त्रीची तुलना सायकलच्या मागच्या चाकाशी केली. कारण पुढचं चाक स्त्री-पुरुषाच्या हाती देते. कारण मागच्या चाकावर पूर्ण प्रवास अवलंबून असतो हे ती जाणते. कुटुंबाच्या जबाबदार्या सांगताना त्यात सायकलला गती देणारी चेन, ओझे सावरणारी कॅरियर, प्रकाश दाखविणारा डायनामो तसेच आधार देणारे स्टँड अशा अनंत पातळ्यांवरच्या जबाबदार्या सायकलच्या मागच्या चाकाप्रमाणे स्त्रीच सांभाळू शकते.
आजवर आपल्याला आधी भाषण करावं लागलं नंतरच मदतनिधी दिला गेला, परंतू सिडकोच्या लेकरांनी मात्र भाषणाच्या आधीच मदतनिधी दिल्याचे गौरवोदगार सिंधुताईंनी काढले. कार्यक्रमास पुष्पलता पाटील, अनुराधा सत्रे यांच्यासह सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल, सरचिटणीस मिलिंद बागूल, मुख्य सामाजिक सेवा अधिकारी रीमा दीक्षित तसेच वरिष्ठ संख्यातज्ज्ञ रीटा अब्बी आदी मान्यवर उपस्थित होते.