विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी होणार असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यासाठी केवळ चोवीस तास (हे वृत्त लिहिपर्यंत) बाकी आहेत. भारताने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी गत विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला चांगलीच धूळ चाखल्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वातील क्रिकेटच्या चाहत्यांच्या भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारत आणि पाकिस्ता यांच्यापैकी विजेता ठरणारा संघ अंतिम सामन्यात खेळेल हे निश्चित आहे. या सामन्याबद्दल संपूर्ण देशात वृत्तपत्र माध्यमांसह विविध प्रसार माध्यमे आणि सामान्यांची उत्कंठा देखील क्षणाक्षणाला वाढते आहे. अनेक ठिकाणी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयांमध्ये मात्र सुटी नसल्यामुळे कर्मचार्यांचा हिरमोड झाला आहे. अनेक नोकरदारांनी तर हा सामना पाहण्यासाठी चक्क सुटी टाकली असून काही कर्मचारी ऐनवेळी कारण सांगून सुटी घेण्याच्या विचारात आहेत.
सचिन तेंडुलकर आपले शंभरावे शतक या सामन्यात पूर्ण करतो अथवा नाही, यावर सट्टेबाजी सुरू आहे.