हिंदवी स्वराज्याच्या या संस्थापकास विनम्र अभिवादन...! |
मुंबई, ता. २ - लंडनमधील मादाम तुसाँ वॅक्स म्युझियमच्या तोडीचे वॅक्स म्युझियम मुंबईमध्ये उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले.
लोणावळा येथील 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' चे आर्टिस्ट सुनील कंदल्लूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेण पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ गिरगाव चौपाटीनजीकच्या इक्सिया इव्हेंट लाऊंजमध्ये श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, आपण स्वतः लंडन येथील मादाम तुसाँ म्युझियमला भेट दिली असून विविध देशांच्या महान व्यक्तींचे मेणाचे पुतळे असलेले हे म्युझियम पाहण्यासाठी अक्षरशः रांगा लागलेल्या असतात. तसे म्युझियम जगात कुठेही आपल्या पाहण्यात नाही. परंतू गेल्या आठवड्यात लोणावळा परीसरात कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असताना मुद्दाम 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' भेट दिली आणि स्तंभित झालो. मादाम तुसाँ इतके हे म्युझियम भव्य नाही, मात्र सुनिल कंदल्लूर या कलाकाराची कामगिरी मात्र मादाम तुसाँ वॅक्स आर्टिस्टच्या तुलनेत कुठेही कमी नाही. त्या कलाकारांच्या तोडीचा हा कलाकार आपल्या देशात असल्याचा आपल्याला अभिमान आहे. तयार करण्यात आलेला हा पुतळा अत्यंत तेजस्वी आणि सजीव वाटत आहे. जणू काही छत्रपतीच या सभागृहात अवतीर्ण झाल्याचा भास होतो आहे. त्यांच्या पाणीदार डोळ्यांमधील तेज, धारदार नाक ही सारी वैशिष्ट्ये पुतळ्यात हुबेहुब उतरली आहेत. शिवरायांकडे पाहिल्यानंतर लोकांना आदरयुक्त जरब वाटते. तीच भावना या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर होत असून पाहणारा नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीच या पुतळ्याची वाखाणणी करून प्रशस्तीपत्रक दिले आहे. यामुळे कलाकाराच्या कामगिरीला दाद दिल्याखेरीज रहावत नाही.
मेण-पुतळे तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण नाही- कंदल्लूर
आपण मेण-पुतळे तयार करण्याचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसून मादाम तुसाँ म्युझियमला भेटही दिलेली नाही. परंतू चमत्कार अथवा साक्षात्कार म्हणून आपण काम करून पुतळे साकारत गेलो. गेल्या १३ वर्षात घेतलेल्या परिश्रमांचे मिळालेले फळ म्हणजे छत्रपतींचा पुतळा आपल्या हातून साकारला गेला. या शब्दात भारावून गेलेल्या आर्टिस्ट कंदल्लूर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भुजबळ यांचाही मेण-पुतळा तयार करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रमुख रोहिदास लोखंडे, म्युझियमचे संचालक ऍड. सुभाष कुमार उपस्थित होते. सूत्रसंचालन मोनाली कुलकर्णी यांनी केले.