मुख्य सामग्रीवर वगळा

कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी देशातील तरुण पिढीचे योगदान मोलाचे: भुजबळ

मुंबई, दि. 2 मार्च :  देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या तरूण पिढीचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे केले.
माटुंगा (पूर्व) येथील 'वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ऍन्ड रिसर्च'च्या सभागृहात काल सायंकाळी झालेल्या 'कृषी-धन-2011' या कार्यक्रमात ते बोलत होते. द एनर्जी ऍन्ड रिसोर्सेस इन्स्टिटयूट (TERI) आणि वेलिंगकर इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी 'कृषी-धन' (www.teriin.org/events/krishidhan/) या वेबसाइटचेही श्री. भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला वेलिंगकर इन्स्टिटयूटचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, 'टेरी'च्या पश्चिम प्रादेशिक केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजली पारसनीस, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे यांच्याबरोबरच देशातील विविध मॅनेजमेंट संस्थांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या पारंपरिक जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कृषी क्षेत्राला वगळून आपण कदापि प्रगती करू शकणार नाही, असे स्पष्ट करून श्री. भुजबळ यांनी नुकत्याच सादर  झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी, अन्नधान्य व उत्पादन वृध्दीसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद स्वागतार्ह बाब असल्याचे सांगितले.
कृषी क्षेत्राच्या प्रगतीमध्ये युवा उद्योजकांनी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले, वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि शेतीखालील जमिनीचे घटते प्रमाण या पार्श्वभूमीवर उत्पादन वृध्दीचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. हरितक्रांतीमुळे देशामध्ये जी कृषी प्रगतीची लाट आली, ती पुढे नेण्यासाठी नवीन धोरणात्मक सुधारणांची आवश्यकता आहे. जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन, शेतकऱ्यांना उपयुक्त व दर्जेदार मार्गदर्शन व कौशल्य विकास, सुलभ दराने आर्थिक सहकार्य यांसह हवामानाबाबत जागृती व मार्गदर्शन, संगणकाधारित तंत्रज्ञानाचा विकास, भू-आरोग्याबाबत दक्षता आदी बाबतीत नवीन कृषी उद्योजक खूप योगदान देऊ शकतात. अंतराळ तंत्रज्ञान किंवा जैव-तंत्रज्ञान आदी नव्या शाखांतील ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करणे ही काळाची गरज आहे.
कृषी-पर्यटनासारख्या वेगळया संकल्पनेचाही तरुण उद्योजकांना लाभ घेता येऊ शकेल, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठया प्रमाणात चालना देण्याची क्षमता कृषी-पर्यटनामध्ये आहे. यातून नियमित शेतीबरोबरच अधिकची मिळकत शेतकऱ्यांना होऊ शकते. स्थानिक बेरोजगारी तसेच हंगामी शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न आदी समस्यांवर कृषी पर्यटन एक चांगला उपाय ठरू शकते. पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच स्थानिक शेतकऱ्यांसाठी सुध्दा कृषी पर्यटन एक चांगला अनुभव आणि मिळकतीचे साधन ठरू शकते. त्यामुळे या क्षेत्रामध्येही तरूण उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याची गरज श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध राज्यांतून आलेल्या व्यवस्थापन संस्थांच्या विद्यार्थ्यांनी कृषी-उद्योगविषयक सादरीकरण केले. त्यामध्ये हैदराबादच्या 'मॅनेज' या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या संघाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी श्री. भुजबळ यांच्या हस्ते 30 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

'ये लालटेन लालूजी का है!'
यावेळी 'टेरी'च्या पश्चिम विभागीय प्रमुख अंजली पारसनीस यांनी श्री. भुजबळ यांना सौर-कंदील भेट दिला. तो स्विकारत असतानाच त्याचा स्वीच ऑन करून श्री. भुजबळ यांनी तो आपल्या एका हातात धरला आणि विद्यार्थ्यांकडे पाहात आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत 'ये लालटेन लालूजी का है!' त्यांच्या या हजरजबाबीपणावर सभागृहात प्रचंड हशा पिकला. टाळयांच्या गजरात विद्यार्थ्यांनी त्यांना दाद दिली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व