(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंदा ‘पनवेलचा महागणपती’ची उज्जैनच्या पार्श्वभूमीवर महाकाल स्वरूपात निर्मिती केली आहे. यंदाचे हे विशेष आकर्षण आणि त्याकरिता साडेसहा हजार स्केअर फुटीचा कोरीव मूर्तीच्या लेण्यांचा तितकाच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक शामियाना कलेच्या उत्तम नमुन्यातून निर्माण करण्यात आला आहे.
मुंबई आणि पुणेनंतर पनवेलमध्येही गणेशोत्सवाचे सांस्कृतिक, धार्मिक आणि भक्तीचे निर्मळ पावित्र्य राखत ‘कांतीलाल प्रतिष्ठान’ने सालाबादप्रमाणे फिल्मसिटीचे कला दिग्दर्शक आणि कारागीरांच्या संकल्पनेतून यंदा ‘महाकाल’चा देखावा उभा करण्यात आला आहे.
मुंबईच्या राजन खातू यांच्या कार्यशाळेत ‘पनवेलचा महागणपती’ सोज्वळ आणि शांतरसाने न्हावून निघत आहे. मूर्ती अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच देखाव्यावरही कारागिरांचा शेवटचा हात फिरत आहे.
महाद्वारावरील १६ फुटी भगवान शंकरांची मूर्ती भक्तांना शक्ति देणारी असून आकर्षित करणारी आहे.
महाकालस्वरूप फिलर, कोरीव मूर्ती आणि प्रशस्त शामियांना तयार करण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरु आहे. पनवेलच्या महागणपतीचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन त्यांचे मनोबल वाढविणारी आणि आवडनिवड जपत गणेशोत्सवाला आकार देण्याचे कार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत.
तेव्हा गणेशोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद, भक्ती आणि समाधान द्विगुणित करावा, असे आवाहन संयोजक किरण करावकर, सुधीर सोमवंशी यांनी केले आहे.