मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: वीज दरांमध्ये कपात करण्याच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, या निर्णयाचे प्रदेश काँग्रेसने स्वागत केले आहे.
सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राकडून विजेचे दर कमी करण्याची मागणी केली जात होती. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून विजेच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने वीज दरात सरसकट 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.
वीज दरांचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्यातील वीज ग्राहकांच्या मागणीला अनुकूल भूमिका घेऊन दर कमी करण्याबाबत शिफारस केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सरकारने सरदहू निर्णय घेतला आहे. दरकपातीच्या निर्णयासाठी राज्य सरकारला सुमारे 7200 कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील दर कपातीप्रमाणेच मुंबई महानगरातही वीजेचे दर कमी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. राज्यातील शेतकरी नुकतेच कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शेतक-यांचे कनेक्शन्स थकबाकीसाठी तोडली जाऊ नये, असेही प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.
मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.