मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबई अनुभवणार 'हवाई फॉम्युला-1' चा थरार

मुंबई, दि. 3: अनेक अभिनव उपक्रमांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात तत्पर असणाऱ्या मुंबईकरांना 'हवाई फॉर्म्युला-1' म्हणून जगभरात लोकप्रिय होत असलेल्या 'एअरो-जीपी' या विमान स्पर्धेचा थरार या वर्षअखेरीस अनुभवावयास मिळणार आहे. या स्पर्धेचे भारतातील संयोजक असलेल्या मे. आय इंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया या कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विनावित्तीय सहकार्यासाठीचे पत्र काल प्रदान केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची आय-इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरभजन सिंग सहगल यांनी गेल्या सोमवारी या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भेट घेऊन त्यांना पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविले आणि मुंबईमध्ये या उपक्रमाच्या आयोजनासाठी एमटीडीसीकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
'इएसपीएन-स्टार' वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील 50हून अधिक देशांत या चित्तथरारक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानुसार काल सायंकाळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी सदर कंपनीला सहकार्य करण्याबाबतचे पत्र दिले.
'एअरो ग्रॅंड प्रिक्स (जीपी)-2011' ही हवाई स्पर्धा अनेक बाजूंनी अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरणार आहे. साधारण 6 ते 8 एअरोबेटिक विमाने एका ठराविक कक्षेत जमिनीपासून अवघ्या 50 फूट इतक्या कमी अंतरावर 400 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने एकमेकांशी स्पर्धा करतील. केवळ एअर रेसिंग असेच स्पर्धेचे स्वरुप नाही, तर एअर कॉम्बॅट, बार्नस्टॉर्मिंग अशा कसरतींनी ही स्पर्धा अधिकच चित्तथरारक आणि रंजक ठरेल. स्पर्धेसाठी मोकळी जागा आवश्यक असल्याने ती समुद्रावर किंवा वाळवंटातच घेता येते. मुंबईच्या समुद्रावर ती घेण्यात येईल. स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशांतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभेल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. एकूण पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तीन दिवस सराव फेऱ्या तर अखेरचे दोन दिवस अंतिम फेरीचे सामने होतील. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता तसेच परवानग्या मिळविल्यानंतर स्पर्धेसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमधील तारखा निश्चित करण्यात येतील, अशी माहिती संयोजकांनी यावेळी दिली.
--
एअरो-जीपी क्रीडा प्रकाराविषयी...
युके स्थित फ्लाइंग एसेस (Flying Aces) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जेफ झॅल्टमन यांच्या संकल्पनेतून सन 2005 पासून 'एअरो-जीपी' स्पर्धा अधिकृतरित्या भरविण्यास प्रारंभ झाला. पहिली स्पर्धा स्लोव्हेनिया (2005) येथे झाली. त्यानंतर माल्टा (2006), रोमानिया (2007 व 2008),  युके (2008), अबु धाबी (2009 व 2010) याठिकाणी ही स्पर्धा भरविण्यात आली. यंदा आयइंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया कंपनीच्या पुढाकाराने आणि एमटीडीसीच्या सहकार्याने ही स्पर्धा या वर्षअखेरीस मुंबईत भरविण्यात येणार आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.