मुख्य सामग्रीवर वगळा

ग्रामपंचायत निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ

मुंबई, दि. 4 : राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकांबाबतच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील निकषात बदल केला आहे. मागासवर्गीय उमेदवारांना याचा लाभ मिळावा म्हणून 21 ऑक्टोबर 2012 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 5 ऑक्टोबर ऐवजी 6 ऑक्टोबर 2012 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली.

राज्यातील 4 हजार 637 ग्रामपंचायतींसाठी 21 ऑक्टोबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने 25 सप्टेंबर 2012 रोजी केली होती. त्यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम 10-1अ मधील तरतुदीनुसार आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नामनिर्देशनपत्रासोबतच जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते; परंतु त्यात आता राज्य शासनाने सुधारणा केली आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नसल्यास संबंधित उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे जातीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी दिल्याची पावती किंवा पुरावा नामनिर्देशनपत्रासोबत जोडावा; तसेच निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भातील हमीपत्रदेखील नामनिर्देशनपत्रासोबत देण्याची तरतूद केली आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी राज्य शासनाने अधिनियमात ही दुरुस्ती केली आहे. त्याचा मागासवर्गीय उमेदवारांना लाभ मिळावा व ते निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून राज्य निवडणूक आयोगाने पूर्वनियोजित ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात अंशत: बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 6 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 ऑक्टोबर ऐवजी 8 ऑक्टोबर 2012 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत 8 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदानाच्या दिनांकात कोणताही बदल केला नसून पूर्वनियोजनाप्रमाणे 21 ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 ऑक्टोबर 2012 रोजी होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही राज्य निवडणूक आयुक्त यांनी सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012