दिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृभाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं..! त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर करणे ही पालकांची जबाबदारी आहे. याचा विसर पालकांना पडलेला दिसतो. एकीकडे मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना, तयारी करताना मात्र आम्हाला मराठीचा विसर पडतो, याचा विचार गांभीर्याने होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सुद्धा सध्याची पिढी अस्खलित मराठी विसरत चालली आहे हे सहज जाणवते. मराठी बोलताना, संवाद साधताना इंग्रजाळलेली मराठी वापरायची (खानदेशी शब्द म्हणजे घुसडायची) सवय झालेली आहे. अलिकडे तसे इंग्रजी सुद्धा वाढले आहे, लोकांना इंग्रजी माध्यम वापरता येऊ लागले आहे, ही बाब चांगली कौतुकास्पद आहे. पण याबरोबर आपली मातृभाषा मराठी मागे पडत चालली आहे.
मराठी बांधव कोणत्याही प्रांतात जावो, स्थायिक झालेला असो, परंतू मराठी विसरू नये, हीच आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त विनंती!