मुंबई, ता. १८ - नूतन वास्तूविशारद आणि अंतर्गत सजावटका कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना आता शासन स्तरावरही उत्तम संधी उपलब्ध होत आहेत, याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथील जे. डब्ल्यू. मॅरियॉट हॉटेलमध्ये काल रात्री नवव्या ड्युरियन सोसायटी इंटेरियर डिझाईन पुरस्कार वितरण श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, भारतीय स्थापत्यशास्त्र आणि अंतर्गत सजावट क्षेत्राला अतिशय समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक ज्ञात-अज्ञात कलाकारांनी विविध राजवटींच्या काळात विविध शैलींच्या माध्यमातून हा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्याची जपणूक करतानाच ही परंपरा पुढे चालविण्याची आणि अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी युवकांवर आहे. अलिकडे शासन स्तरावर देखील साचेबद्ध वास्तूंच्या निर्मितीपेक्षा वैविध्यपूर्ण, आकर्षक तसेच अत्याधुनिक इमारती उभारण्यास शासन प्राधान्य देत आहे. खाजगी क्षेत्रात अधिक नावलौकिक, पैसा मिळत असला तरीही शासन स्तरावर उपलब्ध होणार्या संधींचा लाभ देखील कल्पक वास्तूविशारदांनी घ्यावा. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते आर्किटेक्ट व इंटेरिअर डिझाइनिंगच्या विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करण्यात आला.